महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ डिसेंबर ।। मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात आपले स्वतः चे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. परंतु मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात घर घेणं हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही आहे. त्यामुळेच अनेकजण म्हाडाचा फॉर्म भरतात. म्हाडामध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरी तयार केली जातात.तर म्हाडाचे घर घेण्यासाठी इच्छुक नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.
म्हाडाच्या पुणे विभागाकडील घरांच्या सोडतीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिक ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.
दरम्यान,म्हाडाच्या ६ हजार २९४ घरांसाठी आतापर्यंत सुमारे ६८ हजारांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली आहे.(Pune Mhada Lottery)
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची सुरुवात १० ऑक्टोबर २०२४ पासून झाली होती. या घरांसाठी नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीमुळे अनेक नागरिकांना म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करता आले नाही. त्यामुळे मुदतवाढ करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर म्हाडाने अर् करण्याची मुदत वाढवली आहे.
नागरिकांनी मागणी मान्य करुन म्हाडाने या सोडतीस १० डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ केली होती. मात्र, नागरिकांकडून कागदपत्रांची पूर्तता झाली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळेच म्हाडाने सोडतीसाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज भरण्याची संधी नागरिकांना दिली आहे. इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. (MHADA Lottery Application Date Extended)