महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ डिसेंबर ।। महायुती सरकारचे खातेवाटप आज बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेच राहाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मागणीनुसार त्यांच्याकडे नगरविकास खाते तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पूर्वीचेच अर्थ खाते (Ajit Pawar) दिले जाणार आहे.
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे झाला होता. मात्र, तीन दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. शपथ घेतलेले मंत्री सध्या अधिवेशनात बिन खात्याचे मंत्री म्हणून बसले आहेत. मात्र, बुधवारी मंत्र्यांना खातेवाटप केले जाणार आहे.
भाजपाकडे गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, आदिवासी विकास, ऊर्जा, जलसंपदा, उच्च आणि तंत्रशिक्षण अशी महत्वाची खाती गेली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अपेक्षाप्रमाणे गृह खाते गेले आहे. याशिवाय सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क आणि विधी व न्याय खात्याचा कारभारही त्यांच्याकडे राहील.
भाजपकडे यापूर्वी असलेले गृहनिर्माण खाते शिवसेनेकडे गेले आहे. नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहे. याशिवाय गृहनिर्माण आणि परिवहन खाते शिवसेनेला मिळणार असून त्यापैकी एक खाते शिंदे स्वतःकडे ठेऊ शकतात. शिवसेनेला याशिवाय उद्योग, जलसंधारण, पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, रोजगार हमी, अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, खणीकर्म ही खाती भाजपाकडे असतील. महसूल खात्यासाठी चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात स्पर्धा आहे. मात्र, चंद्रकांत पाटील हे बाजी मारण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना पूर्वीचे ऊर्जा खाते मिळू शकते.
शिवसेनेकडील उत्पादन शुल्क खातेही राष्ट्रवादीला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षाप्रमाणे अर्थ खाते देण्यात आले आहे. त्यांना अर्थ खाते देण्यास शिवसेना आमदारांचा विरोध होता. मात्र हा विरोध डावलून अजित पवार यांना पुन्हा अर्थ खाते दिले गेले आहे. राष्ट्रवादीकडे सहकार, महिला व बालविकास, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, क्रीडा, मदत व पुनर्वसन ही खाती राष्ट्रवादीला मिळाली आहेत. शिवसेनेकडे गेल्यावेळी असलेले उत्पादन शुल्क खातेही यावेळी राष्ट्रवादीला देण्यात आले आहे.