या महागड्या खेळाडूने CSK ची वाढवली डोकेदुखी, लखनौविरुद्धच्या पराभवानंतर कोच स्पष्ट बोलला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ एप्रिल ।। सुरुवातीचे फलंदाज अपयशी ठरत असले तरी तातडीने कारवाई करण्याची गरज नाही, फलंदाजांची अचूक रचना करण्याची केवळ गरज आहे, असे मत गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मांडले.

लखनौ संघाविरुद्ध पाच दिवसांत चेन्नई संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे आता आठपैकी चार विजय आणि चार पराभव झालेल्या चेन्नईची गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

लखनौविरुद्ध मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यानंतर दोन बाद ४९ अशा स्थितीनंतर त्यांनी चार बाद २१० धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात रहाणेसह कर्णधार ऋतुराज गायकवाड सलामीला आला होता. त्याने शानदार शतकी खेळी साकार केली.

त्यानंतर डॅरेल मिचेलला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. लखनौविरुद्धच झालेल्या अगोदरच्या सामन्यात रहाणे आणि रचिन रवींद्र ही चेन्नईची सलामीची जोडी होती तर ऋतुराज तिसऱ्या क्रमांकावर आला होता. सलग दोन सामन्यांत पहिल्या तीन क्रमांकांत बदल करावे लागले होते.

आम्हाला फलंदाजीची अचूक रचना करावी लागणार असल्याचे फ्लेमिंग यांनी आता स्पष्ट केले. काही मुद्यांवर आम्हाला चर्चा करावी लागणार आहे; परंतु तातडीने बदल करण्यापेक्षा योग्य रचना करणे हा त्यावरचा मार्ग असल्याचे फ्लेमिंग यांनी सांगितले.

भारतातील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा गाजवल्यामुळे मिनी लिलावात डॅरेल मिचेलसाठी चेन्नईने १४ कोटी मोजले. त्याच्यावर त्यांचा मोठा भरवसा आहे; परंतु मिचेलला सात सामन्यांतून १४६ धावा करता आल्या आहेत. मिचेलसाठी तिसरा क्रमांक योग्य असल्याचे फ्लेमिंग यांचे म्हणणे आहे; परंतु मंगळवारच्या सामन्यात मिचेलला १० चेंडूंत ११ धावाच करता आल्या होत्या.

मिचेलवर दडपण आहे; परंतु प्रत्येक चेंडू टोलावण्याची गरज असणाऱ्या हाणामारीच्या षटकांतील फलंदाजीचा क्रमांक मिचेलसाठी उपयोगाचा नाही, त्यापेक्षा वरच्या क्रमांकावर तो अधिक मोकळेपणाने फलंदाजी करू शकेल, असे फ्लेमिंग म्हणतात.

दुसरीकडे मार्कस स्टॉयनिसला तिसऱ्या क्रमांकावर बढती देणे लखनौसाठी फलदायी ठरले त्याने फटकावलेल्या ६३ चेंडूंतील नाबाद १२४ धावांमुळे लखनौला विजय मिळवता आला. स्टॉयनिस किती धोकादायक फलंदाज आहेत याची आपल्याला जाणीव आहे, असेही फ्लेमिंग यांनी सांगितले. बीगबॅशमध्ये स्टॉयनिस खेळत असलेल्या मेलबर्न स्टार्स संघाचे फ्लेमिंग प्रशिक्षक आहेत.

स्टॉयनिसकडे चांगली ताकद आहे. तो भरवशाचाही फलंदाज आहे. बीगबॅश स्पर्धेत आम्ही त्याला सलामीला खेळवत असतो, काल पुन्हा मी त्याची क्षमता पाहिली. पहिल्या २६ चेंडूत ५० धावा केल्यानंतर स्टॉयनिसचे खेळाची सूत्रे आपल्या हाती कायम ठेवत आमच्या हातून सामना हिरावला, असे फ्लेमिंग म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *