महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ डिसेंबर ।। मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. प्रामुख्याने मोसंबीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात मोसंबीचे भाव गडगडले आहेत. काही दिवसांपूर्वी ४० रुपये किलो असणारी मोसंबी आता १४ रुपये किलोने विकत आहे. मोसंबीचे भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडला.
उत्तर भारतात मागील काही दिवसापासून थंडीची लाट कायम आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवत असून राज्यात मागील काही दिवसांपासून तापमान घसरले आहे. थंडी अधिक वाढल्याने पिके तसेच फळबागांवर याचा परिणाम होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. तसेच जालन्यातून मोठ्या प्रमाणात मोसंबी उत्पादन होत असून सध्या मागणी घातल्याने त्याचा परिणाम दर घसरण्यावर झालेला पाहण्यास मिळत आहे.
बाजार समितीमध्ये दररोज १०० ते १५० टन मोसंबीची आवक होत आहे. मात्र मोसंबीची मागणी कमी झाली असून त्याचा थेट परिणाम मोसंबीच्या भाव वाढीवर झाला. दरम्यान मोसंबीच्या भावामध्ये एक महिन्यानंतर भाव वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. मागणी कमी झाल्याने मोसंबीचे दर ४० रूपये किलोवरून १४ रुपयांवर घसरले आहेत. यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.
नवीन तुरीची आवक; दर अडीच हजारांनी घसरले
लातूर जिल्हा प्रामुख्याने सोयाबीन आणि तूर उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या नवीन तुरीची आवक पाहायला मिळत आहे. दरम्यान नविन तुरीला ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतो आहे. मात्र यंदा उत्पादन चांगले होऊन देखील भावात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पाहायला मिळत आहे.