एसटीच्या ताफ्यात आणखी ४०० शिवशाही दाखल करण्याचा प्रस्ताव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. १० ऑगस्ट -अपघात, बिघडलेले वेळापत्रक, अस्वच्छता, चालकांकडून वेळेत न मिळणारे भाडे अशा कारणांमुळे शिवशाही बस टीकेचे लक्ष्य ठरल्या. असे असतानाही एसटीच्या ताफ्यात आणखी ४०० वातानुकूलित शिवशाही गाडय़ा दाखल करण्याचा प्रस्ताव आहे.‘‘खासगी प्रवासी वाहतुकीला ज्या मार्गावर जास्त प्रतिसाद मिळतो त्या ठिकाणी जास्तीत जास्त शिवशाही चालवून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न असेल,’’ असे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी सांगितले. चार ते सहा महिन्यांत या गाडय़ा दाखल करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

भविष्यात शिवशाहीला प्रतिसाद वाढावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून भाडे कमी ठेवण्याचाही विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले.जून २०१७ मध्ये वातानुकूलित शिवशाही बसेस सेवेत दाखल झाल्या. त्यांची संख्या हळूहळू वाढून १,२०० पर्यंत गेली. यातील ५४० बस एसटीच्या मालकीच्या आणि ६६० भाडेतत्त्वावर आहेत.

भाडेतत्त्वावरील सुमारे ७८ शयनयान (स्लीपर) वातानुकूलित गाडय़ाही सेवेत दाखल करून घेण्यात आल्या. मात्र या सेवेला वाढत्या अपघातांमुळे गालबोट लागले. भाडेतत्त्वावरील बसगाडय़ांवर प्रशिक्षित चालक नसल्याने अपघात होत असल्याची चर्चा झाली. त्यातच मधल्या बस थांब्यांवरून प्रवाशांना न घेताच बस मार्गस्थ होणे, बस वेळेत न सुटणे इत्यादी कारणांमुळे या सेवेबाबत कायम तक्रारी राहिल्या. शयनयान सेवांच्या अवाच्या सवा भाडय़ामुळे प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरवली. परिणामी काही मार्गावरील शयनयान सेवा बंद करण्यात आली.

भाडेतत्त्वावरील बसचालकांना मोठय़ा प्रमाणात दंड ठोठावणे, त्यांचे भाडे वेळेत न देणे अशा प्रकारांमुळे काही चालकांनी माघार घेतली. त्यामुळे शिवशाही बसेसची संख्या कमी झाली.सध्याच्या घडीला एसटीच्या ताफ्यात ८७० शिवशाही बसेस असून, भाडेतत्त्वावरील बसेसची संख्या ३३० पर्यंत पोहोचली आहे. ७८ शयनयान बसेसपैकीही फक्त ३० ताफ्यात आहेत.

उत्पन्नात घट, तरीही..

टाळेबंदीमुळे गेल्या चार महिन्यांत एसटीचे २,५०० कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडाले असून कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. ५५० कोटी रुपये शासनाकडून घ्यावे लागले. पुढील सहा महिने यातून सावरण्यात जातील. त्यात भाडेतत्त्वावरील बसेस ताफ्यात दाखल करण्याचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *