Vegetable Price : नवीन लसणाच्या दरात घसरण, तर भाजीपाल्याचे दरही झाले कमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ डिसेंबर ।। भाजीपाला मार्केटमध्ये सध्या आवक वाढण्यास सुरवात झाल्याने भाज्यांचे दर खाली घसरत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. याशिवाय एपीएमसी कांदा, बटाटा बाजारात नवीन लसणाची आवक सुरु झाली आहे. यामुळे लसणाच्या दरात देखील घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी भाजी मार्केटमध्ये तेजी होती. एकवेळ भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते. तसेच लसूणच्या दर देखील तीनशे ते चारशे रुपयांवर पोहचले होते. यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर हे दर गेले होते. मात्र सध्या बाजारात भाजीपाल्यासह लसूणची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे बाजारात भाव घसरल्याचे पाहण्यास मिळत आहे.

एपीएमसी बाजारात लसणाची आवक वाढली
एपीएमसी कांदा, बटाटा बाजारात नवीन लसणाची आवक सुरु झाली आहे. नवीन लसूण आल्याने स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या लसणाचे भाव ५० रुपयांनी घसरले आहेत. एपीएमसी मार्केटमध्ये नवीन लसूण १५० रुपये प्रतिकिलोने विकला जात असून जुना लसूण २०० ते २५० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. तर किरकोळ बाजारात देखील नवीन लसणाचे दर घसरले असल्याने गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मनमाड (नाशिक) : बाजारात सध्या भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून त्यात कोथिंबीरीचे दर प्रचंड कोसळले आहेत. बाजारात अवघ्या एक ते दोन रुपयांना जूडी विकली जात असल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. एक एकर कोथिंबीरसाठी ३० ते ३५ हजार रुपयांचा खर्च करून पहिल्यांदा कोथिंबीर विकून अवघे ३५०० रुपये हातात आल्याने संतप्त झालेल्या नाशिकच्या येवला तालुक्यातील राजापूर येथील राजेंद्र देवराम वाघ या शेतकऱ्यांने एक एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवला आहे.

अमरावती : अमरावतीच्या बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे दर कोसळले आहेत. भाजीपाल्याचे दर ५० टक्क्याने घसरल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यात फुलकोबी ८ रुपये किलो, वांगे १० रुपये आणि टोमॅटो २० रुपये, पालक १० रुपये प्रति किलो, गाजर २५ ते ३० रुपये प्रति किलोवर आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *