राज्यात या ठिकाणी धावणार केबल टॅक्सी ; नव्या परिवहन मंत्र्यांकडून प्रवाशांसाठी Good News

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ डिसेंबर ।। मुंबई आणि ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईसह ठाण्यात लवकरच केबल टॅक्ट सुरू होईल अशी माहिती आहे. महाराष्ट्राचे नवे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केबल टॅक्सीचे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीतून मुक्त करण्यासाठी सर्व पर्याय शोधले जातील, असं सांगितलं. या पर्यायांमध्ये केबल टॅक्सीचाही समावेश असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारताच केबल टॅक्सीबाबत उत्साह व्यक्त केल्याने हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून याकडे पाहिलं जात आहे.

परदेशात केबल टॅक्सीची सुविधा
सध्या परदेशात केबल टॅक्सीची सुविधा आहे. प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेनंतर काम पुढे वाढत गेल्यास लवकरच मुंबई – ठाणेकरांना प्रवासासाठी नवीन साधन उपलब्ध होऊ शकतं.

काय आहे प्रताप सरनाईक यांची योजना?
परिवहन मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सरनाईक म्हणाले की, केबल टॅक्सी ही मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) वाहतुकीसाठी लोकप्रिय ठरू शकते. सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी नाही. प्रताप सरनाईक यांनी सांगितलं, की आपण १५ किंवा २० सीटर केबल टॅक्सी चालवली, तर आपल्याला ट्रॅफिकपासून मुक्तता मिळू शकते. जर आपण मेट्रो चालवू शकतो, तर केबल टॅक्सी चालवण्यास कोणतीही समस्या नाही. केबल टॅक्सीसाठी रोप वे बनवण्यासाठी अधिक जमीनीची गरज लागणार नाही.

गडकरींनीही केलेला केबल टॅक्सीचा उत्तम वाहतुकीचं साधन म्हणून उल्लेख
त्याशिवाय सरनाईक यांनी असंही सांगितलं, की महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अंतर्गत केबल टॅक्सी चालवल्या जाणार आहेत, त्यामुळे ही यंत्रणा व्यवस्थित चालेल. सरनाईक यांच्या आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही केबल टॅक्सी हे वाहतुकीचं उत्तम साधन असल्याचं सांगितलं होतं. केबल टॅक्सीला पॉड टॅक्सी देखील म्हणतात. केबल टॅक्सी वीज आणि सोलरवर चालतात. हे वाहतुकीचे अतिशय उत्तम आणि पर्यावरणपूरक साधन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *