महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३० डिसेंबर ।। हळद व्यापारी आणि हळद शेतकरी यांना यंदाचे वर्ष फायद्याचे राहिले आहे. सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्डमध्ये हळदीच्या सौद्यात प्रति क्विंटलला ७२ हजार रुपयेपर्यंत उच्चंकित दर मिळाला आहे. त्यामुळे हळद दराला सोन्याची झळाळी आल्याची चर्चा सुरू झाली आहे. हळदीला यंदा सरासरी १८ ते २४ हजाराच्या दरम्यान दर मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर तिपटीने वाढलेला आहे.
सांगलीतील बाजारपेठ ही हळदीसाठी आशिया खंडातील प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. शेतकऱ्यांच्या हळदीला चांगला दर पारदर्शी व्यापार वेळेवर पैसे मिळत असल्याने राजासह देशभरातून या ठिकाणी हळदीचे आवक मोठ्या प्रमाणात होत असते. येथील हळद दरावर इतर बाजारपेठ व हळदीचे देशभरातील दर ठरत असतात. अर्थात हळदीची आवक सुरु झाल्यानंतर सुरवातीपासूनच चांगला दर मिळत असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हळद लागवड घटली
गेल्या वर्षी मान्सूनने सुरुवातीला महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये ओढ दिल्याने हळद लागवड घटली. त्याच्या वाढीवरही परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. परिणामी हळदीच्या सरासरी दरात वाढ होऊन हळद शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. सध्या सांगलीच्या बाजार समितीमध्ये आतापर्यंतचा सर्वोच्च दर मिळत असून या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.
बाजार समितीत आवक कमी
मान्सूनचा परिणाम म्हणून हळद लागवडीचे क्षेत्र घटले होते. यामुळे उत्पादन हवे तसे मिळत नसून मागील काही दिवसांपासून हळदीची आवक कमी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे हळदीच्या दराने उच्चांक गाठला असून सध्या लिलाव बाजारात हळदीला ७२ हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे.