महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३१ डिसेंबर ।। नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. पुणेकर देखील नववर्षाच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत. पुण्यामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पार्टींचे देखील आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील एका पबने नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले होते. या पार्टीची जोरदार चर्चा होत आहे. पण आता ही पार्टी रद्द करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंढवा भागातील नामांकित पबमध्ये होणारी पार्टी अखेर रद्द करण्यात आली आहे. नव वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले होते. पुणे पोलिसांकडून या पबला काल नोटीस देण्यात आली होती.
पुणे पोलिसांच्या नोटीसनंतर संबंधित पबने होणारी पार्टी अखेर रद्द केली आहे. पुण्यातील या पबमध्ये होणाऱ्या पार्टीची पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. तसेच या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंद केले होते. सध्या पुणे पोलिसांडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. या पबच्या पार्टीची सध्या सोशल मीडियावर देखील चर्चा सुरू आहे. या पबकडून देण्यात आलेल्या कंडोम आणि ओआरएसच्या पाकिटांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
पुण्यातल्या मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट पबमध्ये नव वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले होते. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या अनुषंघाने कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला होता. पण या पबविरोधात अनेकांनी तक्रार दाखल केली होती. काँग्रेसने देखील आक्रमक होत पबविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.