महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ ऑगस्ट – कोरोनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्यसुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे. प्रस्ताव दिल्यास बुलढाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयाच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात केले.
बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालय व देऊळगांव राजा येथील कोविड हेल्थ सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे ऑनलाईन तंत्राचा वापर शिक्षणापासून ते कार्यालयापर्यंत सर्वत्र होऊ लागला आहे. केवळ अद्यावत सुविधा उपलब्ध केल्या म्हणजे रूग्ण बरा होत नाही. त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ यासारख्या प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मितीही आवश्यक आहे. त्यासाठीच बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा प्रस्ताव द्यावा. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, दे. राजा नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे, बुलडाणा कृ.उ.बा.स. सभापती जालींधर बुधवत, जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, मो. सज्जाद आदी मान्यवर उपस्थित होते.