महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई : मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्य सरकारकडून येत्या चार दिवसांत याबाबतचे आदेश जारी करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, मास्क आणि सॅनिटायझर सर्वसामान्यांना परवडेल, अशा दरात उपलब्ध असतील. काहीजण अव्वाच्या सव्वा भावात मास्क विकत आहेत. मात्र, मास्कच्या क्वालिटीनुसार आम्ही दर नियंत्रित करणार आहोत. तसेच कोरोनाच्या चाचणीचे दरही आपण १९०० रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. तर घरी जाऊन चाचणी करण्यासाठी नागरिकांना २४०० ते २५०० रुपये मोजावे लागतील, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
राजेश टोपे यांची आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, खासगी डॉक्टरांना विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी होत आहे. त्यावर राज्य सरकार विचार करेल. तसेच आज पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीवेळी राज्य सरकारकडून महाराष्ट्रात साथीच्या रोगासाठी विशेष रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यापैकी पहिले रुग्णालय मुंबईत उभारले जाईल. यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णालये उभारली जातील, असे टोपे यांनी सांगितले.