महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जानेवारी ।। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला मंगळवारी (दि. 7) दुपारी 12 वाजता घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. गेल्या मंगळवारी (दि. 31 डिसेंबर) सुरू झालेली मातेची मंचकी निद्रा आज पहाटे संपत असून मातेची मुख्य मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापीत होत आहे. मातेच्या स्थापीत मुख्य मूर्तीला पंचामृत अभिषेक घातल्यानंतर षडोपचार पूजा होईल. त्यानंतर नैवेद्य, धुपारती, अंगारा काढून दुपारी 12 वाजता मंदिरातील गणेश विहार ओवरीमध्ये वैदिक मंत्रोच्चारात यजमान प्रा. विवेक गंगणे व त्यांच्या पत्नी प्रियंका गंगणे या उभयतांच्या हस्ते शाकंभरी देवीची प्रतिमा स्थापित होवून त्याठिकाणी घटस्थापना केली जाणार आहे.
यावेळी यजमानांच्या हस्ते नवरात्र महोत्सव काळात अनुष्ठानासाठी स्थानिक ब्रम्हवृंदांना वर्णी (सुपारी) देवून आमंत्रित करण्यात येणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून या नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी सुरू होती. स्थानिक तिन्ही पुजारी संघटना एकत्रित येऊन मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव भक्तीभावाने साजरा करतात. यावर्षी शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे यजमानपद पाळीकर पुजारी संघटनेला मिळाले आहे. यामध्ये मंदिर संस्थानही महत्वाची भूमिका बजावणार आहे. या नवरात्र महोत्सवासाठी होणारा खर्च आतापर्यंत यजमान व संस्थान मिळून करीत आले आहेत. 31 डिसेंबरला दर्शवेळा अमावस्येदिवशी मातेच्या सायंकाळच्या षडोपचार पूजेनंतर देवीची मुख्य मूर्ती सिंह गाभार्यासमोरील शेजघरात चांदीच्या पलंगावर निद्रिस्त केली होती. सात दिवसांची निद्रा पूर्ण करून आठव्या दिवशी मंगळवारी (दि. 7) पहाटे मातेची मुख्य मुर्ती चांदीच्या सिंहासनावर अधिष्ठीत केली जाणार आहे. या नवरात्र महोत्सवालाही शारदीय नवरात्रौत्सवाप्रमाणेच अनन्य साधारण महत्व आहे. या उत्सवाला छोटा दसरा म्हणूनही संबोधले जाते. शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या प्रारंभालाही मातेची त्रिकाळ पूजा होईल. सामान्य भाविकांना दिवसभरात मुख, धर्म, अभिषेक तसेच स:शुल्क दर्शन व्यवस्थेच्या लाभासोबत मंदीर प्रदक्षिणा, महाद्वार, कळस दर्शनही घेता येणार आहे. यानिमीत्ताने नवरात्रात सर्व धार्मिक विधी, मातेच्या सेवा मंदिरात पार पाडण्याची मुभा असल्याने भाविकांची गर्दी होणार आहे. मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव पौष पौर्णिमेपर्यंत (दि. 13 जानेवारी) चालणार आहे. त्यादिवशी शाकंभरी नवरात्र महोत्सवाची घटोत्थापनाने सांगता होणार आहे.
दररोज असेल छबीना मिरवणूक
या नवरात्रौत्सवात देवीच्या विविध रूपातील पाच अलंकार महापूजा व दररोज सायंकाळी मंदिर परिसरात मातेची छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवाय या नवरात्रोत्सवातील मुख्य आकर्षण समजला जाणारा जलयात्रेच्या मिरवणूकीचा सोहळा शनिवारी (दि. 11) पार पडणार आहे.