पुण्याचा पाणीप्रश्‍न मिटला ; खडकवासला ओव्हर फ्लो;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी- पुणे – दि. १३ ऑगस्ट – रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत-वरसगाव खोर्‍यासह टेमघर-मुठा, सिंहगड भागात बुधवारी (दि. 12) सायंकाळी पाच वाजेपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुणे शहरासह ग्रामीण भागातील शेतीला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला साखळी प्रकल्पातील खडकवासला धरण 100 टक्के भरले असून, बुधवारपासून मुठा नदीत 400 तर कालव्यात एक हजार क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढल्यास पुन्हा जादा पाणी मुठा नदीत सोडले जाणार आहे.

खडकवासला धरण शंभर टक्के भरल्यामुळे पुणे शहरला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. मात्र खडकवासला साखळी धरणामधील उर्वरित तीनही धरणे अजुनही शंभर टक्के भरलेली नाहीत. मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सायंकाळी पाच या गेल्या 24 तासात धरणसाखळीत जेमतेम 0.38 टीएमसीची पाण्याची भर पडली. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या संततधारेमुळे पाणी साठ्यात वेगाने वाढ सुरू झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास चार ते पाच दिवसांत पानशेत धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. तर पवना धरणामध्ये आतापर्यत 53.39 टक्के पाणीसाठा झाला आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गुंजवणी धरण व परिसरात पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे पाण्याची पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. परिणामी विद्युत गृहातून 300 क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो, अशी माहिती धरणांच्या अधिका-यांनी दिली आहे. नदी काठच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *