महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी- पुणे – दि. १३ ऑगस्ट – राज्यात चार वर्षांपूर्वी मराठा समाजाने आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चा व आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या 42 आंदोलकांच्या कुटुंबांतील प्रत्येकी एकाला एसटी महामंडळात नोकरी व 10 लाख रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर 58 मोर्चे काढण्यात आले होते. याचदरम्यान, समाजातील अनेक तरुणांनी विविध मराठा संघटनांच्या माध्यमातून आंदोलन, उपोषण केले होते. या आंदोलनात जवळपास 42 मराठा तरुणांनी बलिदान दिले होते. हे तरुण संबंधित कुटुंबांचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यामुळे बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील व्यक्तीला मदत करावी, अशी मागणी मराठा संघटनांनी केली होती.
तत्कालीन फडणवीस सरकारने संबंधितांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, काही कुटुंबीयांना मदत मिळाली तर काहींना मदत मिळाली नव्हती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मराठा संघटनांनी सरकारला मदतीची आठवण करून दिली होती. त्याचवेळी कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याचीही मागणी लावून धरली होती.बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली व 10 लाख रुपये मदत देण्याबरोबरच संबंधितांच्या कुटुंबातील एकाला एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर दिली.
मराठा आरक्षण लढ्यात बलिदान देणार्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी व आर्थिक मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळाचे आभार मानतो असे ट्विट मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील यांनी केले आहे.