महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जानेवारी ।। दक्षिण महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांचा व्यवसाय सध्या गंभीर संकटातून जात आहे. गेल्या काही महिन्यांत समुद्री वादळे, अवकाळी पाऊस यामुळे मच्छिमारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यातच, दक्षिणेकडील खराब वाऱ्यांच्या तीव्रतेमुळे समुद्रातील मच्छिमारी देखील ठप्प झाली आहे. या संकटामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन आणि व्यवसाय संकटात सापडले आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या समुद्री वादळामुळे आणि चक्रीवादळामुळे मच्छिमारांचे कामकाज पूर्णपणे विस्कळित झाले. समुद्रात फाटलेली जाळे, इतर आर्थिक संकटे यामुळे मच्छिमारांचे जीवन अवघड झाले आहे. मच्छिमारांना बोटी चालवण्यासाठी लागणारा डिझेल, बर्फ, ऑईल आणि खलाशी वर्गाच्या पगाराची अडचण मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यावर सरकारची उदासीनता आणि खाजगी बँकांमार्फत घेतलेले कर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेले पैसे कमी पडत आहेत. यामुळे मच्छिमारांच्या परिवारावर आर्थिक संकट आणखी गडद होत आहे.
श्रीवर्धन, मुळगाव, बागमांडला, शेखाडी, दिवेआगर, आदगाव, दिघी, कुडगाव आणि इतर किनारपट्टी भागातील मच्छिमारांच्या बोटी आता नांगरलेले आहेत. कारण मच्छिमारांना पोटाची खळगी भरण्यासाठी आता समुद्रातील माशांवर आधारीत त्यांचा व्यवसाय मुळीच चालत नाही.