महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जानेवारी ।। अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ला हा मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळत गेली आहे, याचे हे लक्षण आहे. त्याच भागात मध्यंतरी एकाची हत्या झाली आणि आज सैफ अली खानवर हल्ला झाला, हे सगळे चिंताजनक आहे. राज्य सरकारने, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावे, असे मत ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
गुरुवारी कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने बारामती दौर्यावर असलेल्या पवार यांनी सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राज्य सरकारवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.
कृषिक प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खानवरील हल्ल्याचे वृत्त समजताच खान कुटुंबाशी फोनद्वारे संपर्क साधला. माझी कुठे गरज भासली तर कळवा, असे त्या फोनवर म्हणाल्या. त्यांनी हा फोन कोणाला केला हे स्पष्ट झाले नाही, परंतु करिना कपूरची मोठी बहीण करिष्मा कपूरला त्यांनी हा फोन केल्याचे सांगितले जात आहे.