HSC-SSC Result Date : आता जून मध्ये नाही तर ‘या’ महिन्याच्या १५ तारखेपर्यंत १०-१२वी चे निकाल लागणार!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जानेवारी ।। विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी पुण्यात दिली. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी दहावी बारावीच्या परीक्षा लवकर सुरु होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यामुळे त्यांचा निकालही १५ मेपर्यंत जाहीर होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं आहे. भुसे यांनी शुक्रवारी राज्य मंडळात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. शिक्षण विभागातील विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला. या बैठकीदरम्यान शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार या वेळी उपस्थित होते.

सीबीएसई अभ्यासक्रमा बद्दल काय म्हणाले शिक्षणमंत्री ??
‘राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी करताना राज्यातील शाळांमध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीला हा पाठ्यक्रम लागू करण्यात येईल. तसेच, राज्यातील शिक्षकांना नव्या पाठ्यक्रमाची माहिती देऊन, त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण करण्यात येईल. ‘सीबीएसई’प्रमाणेच शाळांचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याबाबतही चाचपणीही करण्यात येत आहे,’ असे दादा भुसे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *