महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जानेवारी ।। चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आता जगासमोर पाकिस्तानची लाज गेल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानला आता घरचा आहेर मिळाला आहे. कारण पाकिस्तानमधील मीडियानेच त्यांची पोलखोल केली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आता पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानात होणारी चॅम्पियन्स करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धा जेमतेम एका महिन्यांवर आहे; मात्र तेथील स्टेडियम अद्याप तयार नाहीत. पाकिस्तानातील समाज माध्यमांवरून अपूर्ण स्टेडियमची छायाचित्र प्रसारीत होत आहेत. त्यामुळे आता माध्यमांच्या स्टेडियम प्रवेशावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निर्बंध घातले आहेत.
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पाकिस्तान बोर्डाने आयसीसीकडे स्टेडियम सोपवण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी आहे; मात्र हे घडण्याची शक्यता कमी आहे. या स्पर्धेतील अंतिम लढत लाहोरला आहे. तेथील गद्दाफी स्टेडियमचे सत्तर टक्केच काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.
या स्टेडियमची क्षमता २१ हजार ५०० वरून ३४ हजारपर्यंत वाढवण्यात येणार आहे. नूतनीकरणात पंचतारांकीत सुविधा असलेले पॅव्हेलियन, प्रेक्षकांसाठी सुखद सीट, अत्याधुनिक रिप्ले स्क्रीन या सुविधा असतील, असे सांगितले होते; मात्र कादीर ख्वाजा यांनी एक्सवर प्रसारीत केलेल्या व्हिडिओत एकाच ब्लॉकमध्ये सीट दिसत आहेत. हॉस्पिटॅलिटी कक्ष ७० टक्केच तयार आहे. शिवाय, इलेक्ट्रिकल वर्कही झालेले नाही. मैदानाची अनेक कामे शिल्लक आहेत. अनेक ठिकाणी चिखल दिसत आहे.
या स्टेडियमची अवस्था समाज माध्यमांवरुन प्रसारीत झाल्यानंतर पाक बोर्डाने स्टेडियममधील पत्रकारांच्या प्रवेशावरच निर्बंध आणले आहेत. त्यांना पूर्वनिश्चित वेळेनुसार; तसेच पाक बोर्डाच्या प्रतिनिधींसहच आता स्टेडियमची पाहणी करता येईल, असे पाक बोर्डाने म्हटले आहे. खोट्या व्हिडिओमुळे पाकिस्तान चॅम्पियन्स स्पर्धेच्या संयोजनास तयार नसल्याचे चित्र निर्माण होत असल्याचा दावाही पाक बोर्डाच्या प्रतिनिधींनी केला.
पाकिस्तानकडून अजूनही चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी कुठे खेळवली जाणार, हे २६ जानेवारीला स्पष्ट होणार आहे.