महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२० जानेवारी ।। अभिनेता विकी कौशल बॉक्स ऑफिसवर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ लवकरच प्रदर्शित होणार असून हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. या सिनेमाचा जबदरस्त टीजर काही दिवसांपूर्वी समोर आलेला. याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कसा दिसेल, याची झलकही काही फोटोंमधून पाहायला मिळाली. आता त्याचे या चित्रपटातील काही नवे लूक समोर आले असून विकीचा कधीही न पाहिलेला अंदाज यावेळी पाहायला मिळाला. प्रेक्षकांनी हे लूक पाहिल्यानंतर रीलिजआधीच ‘छावा’ला ब्लॉकबस्टर हिट म्हटले.
२० जानेवारी रोजी शेअर करण्यात आलेल्या या लेटेस्ट पोस्टमधील फोटोंद्वारे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मांडण्यात आली. पहिल्या फोटोत हातात तलवार, सर्वत्र आग आणि चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतो आहे. दुसऱ्या फोटोत महाराजांच्या हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल, असा लूक विकी कौशलने केला. तिसऱ्या फोटोत सर्वत्र पाणी दिसत असून, छत्रपती संभाती महाराजांच्या रुपातील विकीने भगवी वस्त्र परिधान केली आहेत आणि लक्ष्याच्या दिशेने धनुष्यबाण रोखला आहे. आणखी एका फोटोत त्याच्या हातात त्रिशुळ असून एका हाताने दोरखंड पकडला आहे.
आग, पृथ्वी, जल आणि वायूच्या अवतारांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेची झलक यामध्ये दिसतेय. विकीच्या या पोस्टवर कमेंट करण्यावाचून अनेक सेलिब्रिटीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. सई ताम्हणकरने ‘कडक’ अशी कमेंट केली आहे, तर सारंग साठ्येने ‘जय भवानी’ अशी कमेंट केली. हुमा कुरेशी, आशिष वर्मा या कलाकारांनी फायर इमोजी कमेंट केली आहे. ‘अंगावर काटा आला’, अशीही कमेंट अनेक चाहत्यांनी केली असून, काहींनी रीलिजआधीच या चित्रपटाला ‘ब्लॉकबस्टर हिट’, ‘सुपरहिट’ म्हटले आहे.
१४ फेब्रुवारीला होणार रीलिज
‘छावा’ सिनेमाचा ट्रेलर येत्या २२ जानेवारी रोजी रीलिज होणार आहे. तर १४ फेब्रुवारी २०२५ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.