महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ जानेवारी ।। जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळाली. आता जीबीएसची रुग्णसंख्या 73 इतकी वाढली आहे. पहिल्या दिवशी 24 रुग्णांमध्ये या स्थितीचे निदान झाले होते. त्यानंतर चार दिवसांमध्ये रुग्णांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, सर्वाधिक रुग्ण हे सिंहगड रस्ता परिसरातील आहेत.
एकूण 73 रुग्णांपैकी 44 रुग्ण पुणे ग्रामीण, 11 पुणे शहर आणि 15 रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत. याशिवाय अहिल्यानगर, सोलापूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांतील प्रत्येकी एक रुग्ण पुण्यात उपचार घेत आहे. रुग्ण आढळून आलेल्या भागातील सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाकडून विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत आरोग्य पथकांनी शहर व जिल्ह्यात 7 हजार 215 घरांचे सर्वेक्षण केले.
नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे, स्वच्छ व ताजे अन्न खावे, वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा, आरोग्य पथकांना नागरिकांनी सहकार्य करावे, आजाराची लक्षणे दिसल्यास शासकीय रुग्णालयात जावे.
– डॉ. बबिता कमलापूरकर, साथरोग विभागाच्या सहसंचालिका
ससून रुग्णालयात जीबीएसचे 16 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी दोन बालके आहेत. एक प्रौढ आणि एक बालरुग्ण, असे दोन रुग्ण कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी 100 इंट्राव्हिनस इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शनची खरेदी केली आहे. तर, प्लाझ्माफेरेसिससाठी लागणारे फिल्टर देखील पुरेसे आहेत.
– डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय