Ajit Pawar: ”..तर मी मकोका लावायला मागेपुढे बघणार नाही”, धनंजय मुंडेंसमोरच अजित पवारांची फटकेबाजी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जानेवारी ।। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे गुरुवारी पहिल्यांदाच बीडमध्ये दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसीची बैठक होत आहे. त्यापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात येऊन कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, अमरसिंह पंडित, योगेश क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची उपस्थिती होती.

धनंजय मुंडे हे बाजूलाच उभे असताना अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. आजवर बीडच्या बाबतीत येत असलेल्या बातम्यांवरुन अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीडमध्ये आलो आहे. त्यापूर्वी संघटनेच्या कार्यालयाला भेट दिली. जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आणि इतरांनी विनंती केली होती, पक्षाच्या कार्यालयाला भेट द्या. त्याप्रमाणे मी आलो आहे. आज बीडची बैठक संपल्यानंतर पुण्याची गबैठक आयोजित करण्यात आलेली आाहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत सहाही जागा निवडून येणं आवश्यक होतं. परंतु बीड शहरातली जागा आपण हरलो आणि डॉ. योगेश क्षीरसागर पराभूत झाले. बाकीच्या पाच ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. शहरात अपयश आलेलं असलं तरी नव्या उमेदीने काम सुरु करावं लागणार आहे.

पक्षाची विचारधारा
”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेची आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची जडणघडण केलेली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा, हे शिकवलेलं आहे. सत्ताधारी लोकांनी कसं काम केलं पाहिजे, याचा आदर्श उभ्या महाराष्ट्राला चव्हाण साहेबांनी दिला. त्याच दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे.” असं पवार म्हणाले.

वेडेवाकडे प्रकार सहन करणार नाही
बीडच्या संदर्भाने अनेक वेगवेगळ्या बातम्या येत आहे. जिथं तथ्य असेल संबंधितांवर कारवाई केली जाईल. जिथं तथ्य नसेल तिथे कारवाईचा पाश्न नाही. इथं असणारे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे की, माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. कुठली कामं मंजूर झाले आणि ते व्यवस्थित केले नाही तर मी कडक कारवाई करेन. वेडेवाकडे प्रकार सहन करणार नाही. तो जवळचा किंवा लांबचा कार्यकर्ता बघणार नाही. जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे. तिथे गडबड होता कामा नये. केंद्राचा निधी जिल्ह्यासाठी कसा जास्त आणता येईल, यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहोत.

..तर मकोला लावणार
आपल्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलावलेलं आहे. मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगणार आहे. अनेक वर्षे मी राज्याच्या राजकारणात आहे. १९९१ ला मी पहिल्यांदा खासदार झालो होतो. नंतर आठवेळा आमदार झालो. त्यामुळे माझा जिल्हा, माझा मतदारसंघ, पालकमंत्री पदाची जबाबदारी असलेला जिल्हा मी जवळचा लांबचा,जातीचा, नात्यागोत्याचा विचार केलेला नाही.

१९ फेब्रुवारीला शिवजयंती आहे. आम्ही सगळे शिवनेरी किल्ल्यावर जातो आणि तिथे नतमस्तक होतो. तो आदर्श ठेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. अफवावंवर विश्वास ठेऊ नका. एक गोष्ट पुन्हा सांगतो, जर कुणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल, जर कुणी वेडेवाकडे प्रकार केलेले असतील, विकासाची कामं करताना कुणी खंडणी मागितली तर मी मकोका लावायला मागेपुढे बघणार नाही, मी टोकाची भूमिका घेईन, असा सज्जड दम अजित पवारांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *