![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जानेवारी ।। महापालिकेने हाती घेतलेल्या ‘मिशन 15’अंतर्गत शहरातील महत्त्वाच्या प्रमुख रस्त्यांची कामे जवळपास 90 टक्के पूर्ण झाली आहेत. या रस्त्यांमुळे आता शहरातील वाहतुकीचा वेग वाढणार असून, या रस्त्यांवर यापुढील काळात खोदाई करण्याची कोणतीही परवानगी दिली जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
शहरातील रस्त्यांची अवस्था आणि खड्डे यासंदर्भात सातत्याने चर्चा होते. लोकप्रतिनिधींनी शहरातील रस्त्यांच्या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी महापालिकेने ज्या रस्त्यांवर सर्वाधिक वर्दळ असते अशा 15 रस्त्यांच्या सुधारणांची कामे मिशन 15 अंतर्गत हाती घेतली होती.
त्यात प्रामुख्याने या प्रमुख रस्त्यांवरील खराब झालेल्या रस्त्याची डागडुजी करून त्यावर डांबरीकरण करण्यात येत आहे. या सर्व रस्त्यांची कामे आता अंतिम टप्प्यात असून, किरकोळ कामे पूर्ण झाली की आठवडाभरात शंभर टक्के काम पूर्ण होईल.
एका महिन्यात काम पूर्ण
एका महिन्याच्या कालावधीत पथ विभागाने प्रमुख 15 रस्त्यांच्या डागडुजीचे काम पूर्ण केले आहे. एकूण 92 किलोमीटरच्या रस्त्यांवर 60 हजार 772 चौरस मीटरचे डांबरीकरण करण्यात आले आहे. यासाठी 11 हजार 143 मेट्रिक टन डांबराचा वापर करण्यात आला आहे, तर काही महत्त्वाच्या चौकांमध्ये थर्मोप्लास्टिक पेंटचा वापर करून डांबरीकरण करण्यात आल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
ही कामे झाली पूर्ण
नगर रस्ता – पर्णकुटी चौक ते वाघोली बकोरी फाटा
सोलापूर रस्ता – वानवडी चौक ते आकाशवाणी मांजरी चौक
मगरपट्टा रस्ता – मगरपट्टा चौक ते खराडी बायपास चौक
पाषाण रस्ता – पुणे विद्यापीठ चौक ते पाषाण बावधन सर्कल चौक
बाणेर रस्ता – पुणे विद्यापीठ चौक ते सदानंद हॉटेल चौक
संगमवाडी रस्ता – सीओईपी चौक ते पर्णकुटी चौक
विमानतळ व्हीआयपी रस्ता – पुणे विमानतळ ते गुंजन चौक
कर्वे रस्ता – खंडोजी बाबा चौक ते वारजे चौक
पौड रस्ता – पौड फाटा चौक ते चांदणी चौक
सातारा रस्ता – स्वारगेट चौक ते गुजरवाडी चौक
सिंहगड रस्ता – लक्ष्मी मंदिर चौक ते नांदेड सिटी चौक
बिबवेवाडी रस्ता – पुष्पमंगल चौक ते अप्पर बस डेपो चौक
नॉर्थ मेन रस्ता – कोरेगाव पार्क पेट्रोल पंप ते ताडीगुप्ता चौक
गणेशखिंड रस्ता – सीओईपी चौक – पुणे विद्यापीठ चौक
छत्रपती शिवाजी-बाजीराव रस्ता – स्वारगेट चौक ते शिमला ऑफिस चौक शनिवारवाडा.
‘मिशन 15’अंतर्गत शहरातील सर्वाधिक वाहनांची सर्वाधिक वदऱ्ऴ असलेल्या 32 रस्त्यांची निवड करण्यात आली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात 15 रस्ते विकसित करण्याचे काम पूर्ण होत आले आहे. मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात आले, चेंबर समपातळीवर आणले, डांबरीकरण केले. त्यामुळे या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होईल. दुसर्या टप्प्यात उर्वरित 17 रस्त्यांची कामे केली जातील. काम झालेल्या रस्त्यांवर खोदाई करता येणार नाही.
– अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका