महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जानेवारी ।। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांबद्दल आणि ईव्हीएमसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. झालेले मतदान गेले कुठे? हे रहस्य असल्याचं त्यांनी भाष्य केलंय. भाषणावेळी राजू पाटील यांचं उदाहरण त्यांनी दिलं. पाटील यांच्या गावातील हक्काची मतं कुठे गेलीत? राजू पाटील यांच्या गावातच १४०० मते होती, मात्र एकही मत मिळू नये हे आश्चर्यकारक असल्याचं राज ठाकरे म्हणाले. अशा तक्रारी शेकडो गावागावातून आली आहेत. ही जादू कशी झाली? हे निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
‘महाराष्ट्र आज संकटात आहे. राज्य संपवण्याचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. शिवसेना तोडायची, ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या नावाचं वलय आणि ताकद राज्यात आहे, त्या विरोधात दिल्लीतली उभी आहे. अशा वेळी सातत्यानं भूमिका बदलून चालणार नाही. या संदर्भात भूमिका घेणं सर्वच राजकीय पक्षाला महत्त्वाचं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस आयोगाने द्यायलाच पाहीजे’, असं संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरलं. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या ईव्हीएमबाबतच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. ‘त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत. त्याला विरोध करावा असं काही नाही. राज्यात विरोधासाठी विरोध अशी लाट आहे. त्यातून बाहेर पडलं पाहिजे’, असंही संजय राऊत म्हणाले.
‘राज ठाकरे महाविकास आघाडीत येतील की नाही हे त्यांच्या भाषणावर कसं सांगणार? त्यांच्या भविष्यातील भूमिका काय असतील, त्या महत्त्वाच्या आहेत. त्यांनी ईव्हीएमबाबत भाष्य केलं. त्या मुद्द्याला आमचा पाठिंबा आहे. आम्ही वारंवार सांगतो राज ठाकरे यांची भूमिका भाजपधार्जिणी. एकनाथ शिंदे धार्जिणी आहे. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राचे शत्रू आहेत. राज ठाकरे तिकडे जातात हे राज्याच्या हिताचं नाही असं आमचं म्हणणं होतं. पण तरीही आम्ही त्यांच्या पुढील वाटचालीकडे लक्ष ठेवू’, असं देखील संजय राऊत म्हणाले.