कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका ? धरणांमधून मोठा विसर्ग;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – कोल्हापूर – दि. १७ ऑगस्ट – पावसाची संततधार आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील  नद्या पुन्हा पात्राबाहेर पडल्या आहेत. सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर पोहोचताच नदीकाठच्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील ७० बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदी इशारा पातळीपर्यंत पोहोचल्याने पुराचा धोका वाढला आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा Of the rain जोर कायम आहे. धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने बहुतांश धरणे भरली आहेत. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवारी सकाळी अवघ्या बारा तासात धरणात पाच टीएमसी पाणी वाढले. पावसाचा जोर कायम असल्याने पाटबंधारे विभागाने कोयना धरणाचे सहा दरवाजे दहा इंचांनी उचलून पाण्याचा विसर्ग ५४ हजार क्युसेकपर्यंत वाढवला. यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावरील गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. सांगलीत आयर्विन पूल येथे रविवारी रात्री पाण्याची पातळी ३० फुटांवर पोहोचल्याने सूर्यवंशी प्लॉट, दत्त नगर, काका नगर, नवीन बायपास रोड या परिसरातील सुमारे साडेतीन हजार नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली. खासदार संजय पाटील आणि सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी नदीकाठच्या सखल भागांची पाहणी करून नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या. महापालिका प्रशासनाने शाळांसह काही रिकाम्या इमारतींमध्ये नागरिकांची राहण्याची सोय केली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सांगलीतील पूरस्थिती गंभीर होऊ शकते.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणाचे सातपैकी पाच दरवाजे पुन्हा उघडले आहेत. यातून पंचगंगा नदीपात्रात ५६८४ क्युसेक पाणी येत आहे. याशिवाय वारणा धरणातूनही १४ हजार ४८६ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे आणि जलायश भरल्याने ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ३६ फुटांवर पोहोचल्याने पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी पंचगंगेचे पाणी पात्रात गेले होते. आता पुन्हा पुराचा धोका वाढल्याने नदीकाठच्या गावांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. दरम्यान, दोन्ही जिल्ह्यात एनडीआरएफची चार पथके तैनात असून, नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *