महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. १७ ऑगस्ट – पुणे आणि साताऱ्यात सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागातील एका आधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि साताऱ्याशिवाय मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर मंगळवापासून पावसाचा ओघ कमी होईल.
भारतीय हवामान विभागानं २४ तासांत कमीतकमी २०४.५ मिमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या आधिकाऱ्यानं प्रसारमाध्यमांना सांगितलं की, ‘‘पुणे, कोल्हापूर, सतारा आणि सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील सोमवारपासून मुसळधार पावासाचा अंदाज आहे. सातारा आणि पुण्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.’’
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भासर, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम लांबणार आहे. या दोन विभागासह राज्यात इतरत्र २० ते २२ ऑगस्टपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्याच्या अनेक भागांत ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस आता सरासरीच्या पुढे गेला आहे.