महाराष्ट्र २४ ई पेपर ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी ।। पुणे विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना आता ‘मार्शलिंग’ची (विमानांचा दिशादर्शक) आवश्यकता भासणार नाही. कारण, पहिल्यादांच विमानतळ प्रशासनाने स्मार्ट व्हिज्युअल डॉकिंग मार्गदर्शन प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे कोणत्या ‘पार्किंग बे’वर विमान घेऊन जायचे, एरोब्रिजसाठी कुठे थांबायचे, हे वैमानिकाला समजेल. परिणामी विमानाचे पार्किंग जलद व अचूक होण्यासह विमानतळाच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल.
पुणे विमानतळावर १० ‘पार्किंग बे’ व १० ‘एरोब्रिज’ आहेत. वैमानिक ‘पार्किंग बे’वर येताना ‘स्मार्ट डॉकिंग’ (स्मार्ट पार्किंग) प्रणालीचा वापर केला जाणार आहे. हे विमानतळावरील स्वयंचलित परिचालन नियंत्रण केंद्राशी संलग्नित असणार आहे. त्यामुळे वैमानिकाला कॉकपिटमध्येच संदेश पोहोचेल. त्यामुळे विमानाला ‘एरोब्रिज’ जोडण्यासाठी ‘मार्शलिंग’ची आवश्यकता भासणार नाही.
विमानतळावरील पारंपरिक डॉकिंग प्रक्रियेच्या तुलनेत ही प्रणाली अधिक सुरक्षित व जलद आहे.
– संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे
‘स्मार्ट व्हिज्युअल डॉकिंग’ म्हणजे काय?
ही वैमानिकांना मार्गदर्शन करणारी अत्याधुनिक डिजिटल प्रणाली आहे. तिचा विमानांचे सुरक्षित आणि अचूक पार्किंग करण्यासाठी वापर केला जातो. देशातील प्रमुख विमानतळांवर याचा वापर केला जात आहे. पुणे विमानतळावर पहिल्यादांच याचा वापर केला जात आहे.
प्रणालीचा फायदा काय?
सेन्सर, कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित
विमान पार्किंग अधिक अचूक व वेगवान करण्यासाठी उपयोगी
कॉकपिटमध्येच वैमानिकांना आवश्यक माहिती उपलब्ध
विमानतळावरील अपघात होण्याचा धोका कमी
पार्किंग जागेचा अधिक कार्यक्षमपणे वापर
प्रवाशांच्या वेळेत बचत, स्लॉटची संख्या वाढण्यास मदत