महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ फेब्रुवारी ।। दिल्लीत काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल त्यांच्या मतदारसंघात पराभूत होत आहेत अशी भविष्यवाणी केली होती. ती आज खरी ठरली आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून कधी आघाडीवर कधी पिछाडीवर असा पाठशिवणीचा रंगलेला खेळ आता संपला आहे. अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहेत.
भाजपाच्या प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांना 3186 मतांनी पराभूत केले आहे. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून सुमारे ६०० मतांनी पराभूत झाले आहेत. राजेंद्र नगर मतदारसंघातून आपचे दुर्गेश पाठक यांचाही पराभव झाला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू आहे. भाजपला बहुमत मिळत आहे. काँग्रेसला भोपळा मिळाला आहे. भाजपा ४५, आप २५ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचा तर सुफडा साफ झाला आहे. वेगवेगळे लढण्याची खुमखुमी काँग्रेस आणि आपला नडली असली तरी केजरीवालांचे एकेकाळचे सहकारी अण्णा हजारे (Anna Hazare) यांची बोलकी प्रतिक्रिया आली आहे.
दिल्ली निकालावर (Delhi Election Results) अण्णा हजारे यांनी केजरीवालांना दारू घोटाळ्याने बुडविले, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच हजारेंनी केजरीवालांना स्वार्थी म्हटले होते. अरविंद केजरीवाल पूर्वी तो चांगला होता म्हणून माझ्यासोबत होता. मात्र ज्या दिवशी राजकारण आणि पार्टीच्या नादात अरविंद केजरीवाल स्वार्थी झाला, तेव्हाच त्याच्यापासून मी दूर झालो, या शब्दांत अण्णा हजारे यांनी निशाणा साधला होता. तेव्हा त्याची नियत साफ होती. तेव्हा मला वाटले की, हा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते, असे हजारे म्हणाले होते.