कोरोनाकडे संकट म्हणून नव्हे व्यावसायिक विकासाची संधी म्हणून बघा; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. १७ ऑगस्ट -महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून तयार केलेले साहित्य व उत्पादनास जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे काम ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना काळात ऑनलाईन खरेदीस चालना मिळाली आहे. त्या अनुषंगाने कोरोना संकटामुळे निर्माण झालेली स्थिती ही अर्थार्जनाच्या संधीत परावर्तित करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे आयोजित ऑनलाइन महिला मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात राज्यभरातून जवळपास एक लाख महिला सहभागी झाल्या.

‘उमेद’ अभियानातील स्वयंसहायता गटांनी कोरोना संकटकाळात जागतिक बाजारपेठेत तग धरण्याच्या दृष्टीने स्वतःच्या व्यवसायामध्ये आमूलाग्र बदल करावा. कोरोनाकडे संकट म्हणून न बघता या काळात व्यावसायिक विकास करण्याची संधी म्हणून बघावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त उमेद अभियानातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिला व समुदाय संसाधन व्यक्तींसाठी ऑनलाईन महिला उद्बोधन मेळावा मंत्री श्री. मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सतार, विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मेळाव्यास जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर संबंधित अधिकारी यांच्यासह सर्व जिल्ह्यांमधून महिला ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाल्या होत्या.

१५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात मासिक पाळीविषयक जनजागृतीसाठी ‘जागर अस्मितेचा’ मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त बचतगटांनी सहभागी होऊन ‘अस्मिता प्लस’ सॅनिटरी नॅपकिन विक्री करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले. ‘एक ग्रामपंचायत एक बीसी सखी’ उपक्रमाला अधिक गती मिळण्याकरीता याच कालावधीत ‘उमेद महिला सक्षमीकरण – बीसी सखी तसेच डिजी पे सखी अभियान’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून ग्रामस्थांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा व अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. या अभियानास यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी बीसी सखी म्हणून काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले. उमेद वार्तापत्र स्वातंत्र्य दिन विशेषांकाचे त्यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले.

ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, समाजामधील ५० टक्के शक्ती म्हणजे नारी शक्ती आहे. या नारी शक्तीचा सन्मान व सक्षमीकरण उमेद अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत असून स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या उत्पादनास उमेदच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विधानपरिषद सदस्य तथा माजी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, उमेद अभियानामुळे महिला अधिक अभिव्यक्त होत असून त्यांची राजकीय भागीदारी वाढली आहे. महिलांना नवीन ओळख निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *