महाराष्ट्र २४ ।। ई – पेपर विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ फेब्रुवारी ।। मागील महिन्याप्रमाणे साखरेची दरवाढ सुरूच असून पुन्हा एकदा क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. उत्पादनात झालेली घट, अपुरा कोटा आणि वाढती मागणी यामुळे साखरेची सातत्याने दरवाढ होत आहे. स्थानिक बाजारांत सध्या मागणी कमी असली तरी अन्य राज्यांकडून मागणी चांगली असल्याने दर वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात थंडगार पेय आणि आइस्क्रीमसाठी साखरेची मागणी वाढणार असल्याने दरांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात एस ३० साखरेचा प्रती क्विंटलचा दर चार हजार १०० ते चार हजार १५० रुपये आहे.
जागतिक बाजारांत तेलाचे वाढलेले दर आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारांत सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या डब्यामागे पंधरा ते वीस रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ काही दिवस टिकेल, असा अंदाज आहे.
मागणी वाढल्यामुळे सरकी, सोयाबीन, पाम आणि सूर्यफूल तेलाच्या १५ किलो आणि १५ लिटरच्या डब्यामागे पंधरा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. सोयाबीनला हमीभाव मिळण्याची शक्यता असल्याने सोयाबी तेलाच्या दरांतही वाढ झाली आहे. आवक वाढल्याने शेंगदाणा तेलाचे दर उतरले आहेत. खोबरेल तेल आणि वनस्पती तुपाच्या दरात फारसा बदल झालेला नाही.
‘डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारांत सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या डब्यामागे पंधरा ते वीस रुपयांची वाढ झाली आहे,’ असे तेलाचे व्यापारी आणि ‘द पूना मर्चंट्स चेंबर’चे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी सांगितले.
दरम्यान, शेंगदाण्यास मागणी वाढली असून दर स्थिर आहेत. मिरची, नारळ, पोहे या जिनसांचेही दर स्थिर आहेत. आवक जास्त आणि मागणी कमी असल्यामुळे तूरडाळ आणि हरभरा डाळीचे दर उतरले आहेत. सर्व डाळी आणि कडधान्यांचे दर स्थिर आहेत. नगर आणि सोलापूर जिल्ह्यातून गावरान ज्वारीची आवक सुरू झाली आहे.