महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ फेब्रुवारी ।। शरद पवारांनी टाकलेली गुगली ही कुणालाही समजत नाही, बाजूला बसलेल्यांना आणि बाजूला बसवणाऱ्यांनाही ती समजत नाही. पण पवार साहेब मला कधीही गुगली टाकणार नाहीत, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राजकारणात नातं कसं जपायचं हे पवार साहेबांकडून शिकावं असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा’ने सन्मान कऱण्यात आला. पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थिती होते. या सन्मानाचे स्वरूप पाच लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप होतं.