महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. १३ फेब्रुवारी ।। राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)चे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर मागील 24 तासांमध्ये जीबीएसच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत जीबीएसमुळे 8 जणांचा बळी गेला आहे. राज्यात जीबीएसच्या (Guillain Barre Syndrome) रुग्णांची संख्या दोनशे पार गेली आहे. तर आत्तापर्यंत 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातून 54 रुग्णावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, तर 20 जण व्हेंटिलेटवर आहेत.
रुग्णसंख्येने 200चा टप्पा ओलांडला
गुलेन-बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या मेंदूविषयक आजाराच्या रुग्णसंख्येने 200चा टप्पा ओलांडला आहे. जीबीएसची राज्यातील रुग्णसंख्या 203 इतकी झाली आहे. यांपैकी 176 रुग्णांची निदान निश्चिती करण्यात आली आहे. बुधवारी (दि. 12) शहरात एका 59 वर्षीय रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. राज्यात एकूण 8 मृत्यूंची नोंद झाली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 203 रुग्णांपैकी 94 रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. तसेच, 41 रुग्ण पुणे मनपा, 29 रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा, 31 रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आणि 8 रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. सध्या 52 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आत्तापर्यंत 109 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Guillain Barre Syndrome)
खडकवासलात पुरुषाचा मृत्यू
खडकवासला भागातील 59 वर्षीय पुरुषाचा जीबीएसमुळे (Guillain Barre Syndrome) मृत्यू झाला आहे. या रुग्णाला 10 फेब्रुवारी रोजी नवले हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णाला अशक्तपणा जाणवत होता आणि जागेवरून हलता देखील येत नव्हतं. एनसीव्ही तपासणी केल्यावर प्लाझ्मा फेरेसिसचे उपचार करण्यात आले. 11 फेब्रुवारी रोजी रुग्णाला कार्डिअॅक अरेस्टचा त्रास झाला. उपचारा दरम्यान त्यांचा पहाटे 3.30 वाजता मृत्यू झाला, असे मृत्यू अहवालात सांगण्यात आलं आहे. (Guillain Barre Syndrome)
गुलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे-
– अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता / लकवा
– अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा
– जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
– पिण्याचे पाणी उकळून प्यावे
– स्वच्छ व ताजे अन्न खावे
– शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नये
– वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
– हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ स्वयंप्रतिकार (Auto immune) स्वरुपाचा विकार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच चेतासंस्थांवर (peripheralnervous system) हल्ला करते. यामुळे स्नायू कमजोर होतात आणि गंभीर रुग्णामध्ये पक्षाघातही होऊ शकतो. गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा संसर्गजन्यरोग नाही. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. याचे निश्चित कारण अज्ञात आहे. हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो. त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग नवीन नसून, तो अनेक वर्षांपासून ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर तो विकसित होऊ शकतो. तसेच GBS ची इतर अनेक कारणे असतात. गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग वर्षभर आढळतो. साधारणपणे 1 लाख लोकांमध्ये एकजण या रोगाने ग्रस्त असतो. त्यामुळे, मुंबईतील मोठी रूग्णालये / वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर महिन्याला ‘जीबीएस’ चे काही रुग्ण उपचारासाठी येतात.