GBS Updates : पुण्यातील GBS च्या उद्रेकाचं कारण महिनाभरानंतर अखेर सापडलं ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. १५ फेब्रुवारी ।। पुणे विभागात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) २०५ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी निम्मे रुग्ण हे सिंहगड रस्त्याच्या ५ किलोमीटर परिसरातील आहेत. या रुग्णांमध्ये प्रामुख्याने कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला असून, हेच जीबीएस उद्रेकाचे कारण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी दिली.

पुणे विभागात ९ जानेवारीपासून जीबीएसचा उद्रेक सुरू झाला. आता जीबीएसची रुग्णसंख्या २०५ वर पोहोचली आहे. या रुग्णांपैकी १०६ म्हणजेच ५१ टक्के रुग्ण सिंहगड रस्त्याच्या ५ किलोमीटर परिसरातील आहेत. याचवेळी उरलेले ९९ रुग्ण पुणे शहरातील इतर भाग, ग्रामीण आणि जिल्ह्याच्या भागात आढळून आले आहेत. सिंहगड रस्ता परिसरात आढळलेले ९० रुग्ण हे नांदेड गावातील विहीर आणि खडकवासला धरणातील पाण्याचा स्रोत वापरणारे आहेत. या परिसरातील ३ जीबीएस रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील दोघांचा जीबीएसमुळे आणि एकाचा इतर कारणामुळे मृत्यू झाला आहे, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

सिंहगड रस्ता परिसरातील जीबीएस रुग्णांच्या तपासणीमध्ये २५ रुग्णांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू संसर्ग निष्पन्न झाला आहे. याचवेळी ११ रुग्णांना नोरोव्हायरस हा विषाणू संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरातील पाण्याच्या विविध स्त्रोतांमधील नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४० नमुन्यांचे अहवाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यापैकी ८ नमुन्यांमध्ये कोलिफॉर्म, २५ नमुन्यांमध्ये ई-कोलाय व कोलिफॉर्म, ६ नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस आणि एका नमुन्यामध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आढळून आला, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी नमूद केले.

सिंहगड रस्ता परिसरातील जीबीएस रुग्णसंख्या

विभाग – रुग्णसंख्या – टक्केवारी

नांदेड (गाव, फाटा सिटी) – ३० – २८

किरकटवाडी – २८ – २६

धायरी – १७ – १६

सिंहगड रस्ता (माणिकबाग, दांडेकर पूल, वडगाव, नऱ्हे, हिंगणे खुर्द) – १५ – १४

खडकवासला, कोल्हेवाडी – १२ – ११

आंबेगाव – ४ – ४

एकूण – १०६ – १००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *