महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. १६ फेब्रुवारी ।। कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. कोकणातील एक भाग शिंदेंच्या गोटात गेल्यानंतर कोकणातील एकमेव आमदारही शिंदे गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
आमदार भास्कर जाधव नाराज असल्याचं बोललं जात आहे. ‘मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही’, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसेच भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवर आम्ही चर्चा करत आहोत’, असं देखील राऊत म्हणाले.
‘जाधव यांच्या कुटुंबात लग्न सोहळा आहे. त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा झाली आहे. जवळच्या व्यक्तीचे लग्न सोहळा असल्यामुळे जाधव गुहागरला थांबले होते, असं राऊत म्हणाले. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवर आम्ही चर्चा करत आहोत. आमच्या पक्षात लोकशाही आहे, ते काही एकनाथ शिंदे आहेत का? रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला’, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी जाधव नाराज असल्याच्या चर्चांवर दिली आहे.
भास्कर जाधव काय म्हणाले?
‘शिवसेना आणि पवारांचे मला आशीर्वाद लाभले. महाराष्ट्रात मला मानणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्रात मी लोकांशी बोलतो. संवाद साधतो. यात लबाडी नसते. महाराष्ट्रातील लोकांना हे भावतं. पण मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही’, अशी खंत जाधव यांनी बोलून दाखवली.