महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. १९ फेब्रुवारी ।। पुणेकरांसाठी खुशखबर आहे. मेट्रोच्या दोन नवीन मार्गांना महापालिकेने मंजुरी दिली आहे. हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन या मेट्रो मार्गांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता पुणेकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. लोणी काळभोर आणि सासवड या ग्रामीण भागातही मेट्रोची सेवा मिळणार आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळापर्यंत मेट्रो धावणार असल्यामुळे पुणेकरांसोबत ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे.
दोन्ही मेट्रो मार्गांचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार असल्यामुळे आता लवकर काम सुरु होण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या दोन्ही मार्गांना महापालिकेच्या स्थायी समितीची आणि मुख्य सभेची मान्यता मिळाली आहे. हडपसर ते लोणी कोळभोर मेट्रो मार्ग ११.३५ साडेअकरा किलोमीटरचा असणार आहे. त्यावर १० स्थानके असणार आहेत. तर, हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन या मेट्रो मार्गाची लांबी ५.५७ किलोमीटर असणार आहे. या मार्गावर चार स्टेशन असणार आहेत.
पुणे शहराच्या पूर्व भागातील वाहतूक समस्या गंभीर होत असून याठिकाणी आता मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यासाठी महापालिकेने दोन नव्या मेट्रो मार्गाला मंजुरी दिली आङे. आता हडपसर ते लोणीकाळभोर आणि हडपसर ते सासवड या दोन मार्गावर मेट्रो धावणार आहे. या प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर पुणे महापालिकेला भूसंपादनासाठी केवळ ३.६० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
या नव्या मेट्रो मार्गामुळे पुणे शहरासह उपनगरे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधांसह सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे आवश्यक आहे. त्यामुळे पीएमआरडीए आणि महामेट्रोतर्फे पुणे महापालिकेची हद्द आणि पीएमआरडीएच्या हद्दीसाठी सर्वंकष वाहतूक विकास आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारडून प्रत्येकी २० टक्के निधी देण्यात येणार आहे. ६० टक्के निधी ६० टक्के कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.