महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. १९ फेब्रुवारी ।। पाकिस्तान काही सुधरण्याचं नाव घेत नाहीये. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारताने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वी कराचीत चॅम्पियन्स ट्रॉफीचा ओपनिंग सोहळ पार पडला. यादरम्यान सर्व ७ देशांचे झेंडे लावण्यात आले होते. मात्र भारताचा झेंडा लावला गेला नव्हता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
पाकिस्तानात पुन्हा भारतीय तिरंग्याचा अपमान?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ कराचीचा असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यात एक व्यक्ती सर्व देशांचे झेंडे लावताना दिसून येत आहे. मात्र भारताचा झेंडा त्याने उलटा लावला आहे. तुम्ही जर पाहिलं तर, उर्वरित ७ देशांचे झेंडे व्यवस्थित लावले आहेत, पण भारताचा झेंडा त्याने मुद्दाम उलटा लावला आहे. हे पाहून भारतीय फॅन्स संतापले आहेत.
स्टेडियममध्ये झेंडा न लावण्यावरून झाला होता वाद..
यापूर्वी जेव्हा ओपनिंग सोहळा पार पडला, त्यावेळी भारताचा सोडून इतर ७ संघाच्या देशाचे झेंडे लावले गेले होते. याबाबत बोलताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डने स्पष्टीकरण दिले होते. त्यांचे म्हणणे होते की, आयसीसीने असा सल्ला दिलाय की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत केवळ ४ झेंडे असतील. एक आयसीसीचा, एक यजमान देशाचा आणि २ झेंडे जे देश सामना खेळत आहेत त्यांचे असतील. मात्र ओपनिंग सोहळ्यावेळी ४ पेक्षा अधिक झेंडे होते. त्यात भारतीय तिरंग्याच्या समावेश नव्हता.
आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. तर भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. हा सामना दुबईत खेळवला जाईल.