महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. १९ फेब्रुवारी ।। म्हाडा लॉटरी… सामान्यांचा आणि त्याहूनही घराचं स्वप्न साकार करु पाहणाऱ्या सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी म्हाडाच्या सोडत प्रक्रियेची मोठी मदत झाली आहे. मुंबईसारख्या शहरात जिथं, नवं घर खरेदी करण्याचं स्वप्न अनेकांनीच दूर लोटलं आहे अशा सर्व मंडळींच्या स्वप्नाला पुन्हा बळ देण्याचं काम म्हाडा करत असून, याच म्हाडालासुद्धा आता खऱ्या अर्थानं लॉटरी लागली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात घरं उभारणीसाठीची जागा शिल्लक नसल्याने म्हाडाच्या आगामी सोडतीवर याचा परिणाम होताना दिसला. परिणामी मुंबईकरांना परवडणाऱ्या दरातील घरं उपलब्ध व्हावी म्हणून आता म्हाडा आणि एसआरए एकत्र येत रखडलेले 17प्रकल्प मार्गी लावणार आहेत. खुद्द म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनीच या प्रकल्पांना गती देण्याचे आदेश दिले. ज्यानंतर आता प्राधिकरणांनी एकमेकांशी समन्वय साधत झोपडीधारकांची पात्रता निश्चिती, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया काम तत्काळ सुरू करण्यात येईल.
सध्या आठ प्रकल्पासंदर्भात एसआरएतर्फे कारवाई करण्यात आली असून, हे प्रकल्प मूळ बिल्डरच्या हातून काढत आता उर्वरित प्रकल्पांची व्यवहार्यता तपासायचं कामही सुरु करण्यात आलं आहे. म्हाडाच्या भूखंडावर हे प्रकल्प असून, त्यात गोरेगावमधील 12, वांद्रे येथील 2, कुर्ल्यातील 5, बोरिवली / दहिसरमयेथील 2 प्रकल्पांचा समावेश आहे.
सदर प्रकल्पांतून जवळपास 25 हजार घरांची नव्यानं उभारणी केली जाणार असून, त्यातील निम्मी घरं लॉटरी प्रक्रियेसाठी उपलब्ध होतील, असा दावा म्हाडाने केला आहे. म्हाडाच्या ज्या जमिनीवर झोपड्या आहेत, त्या झोपडीधारकांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण येत्या काळात केलं जाणार आहे. त्यामुळं आता या संपूर्ण हालचालींचा थेट फायदा नवं घर घेऊ पाहणाऱ्या सामान्यांना होणार असं म्हणणं गैर ठरणार नाही.