महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रविवार दि. २३ फेब्रुवारी ।। आधार कार्डवरील चुकीची माहिती मोठ्या अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने वापरकर्त्यांना आपली माहिती अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. मात्र, प्रत्येक बदलासाठी अमर्याद संधी उपलब्ध नाहीत. आधारमध्ये कोणते बदल किती वेळा करता येतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
मोबाइल नंबर अपडेट
आपला आधारसोबत नोंदणीकृत मोबाइल नंबर चुकीचा असल्यास किंवा नवीन नंबर घेतल्यास, तुम्ही तो कितीही वेळा बदलू शकता. UIDAI यावर कोणतीही मर्यादा लावत नाही, त्यामुळे वारंवार नंबर बदलणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही सुविधा सोयीस्कर ठरते.
नाव अपडेट
आधारवरील नाव दोन वेळाच अपडेट करता येते. नाव बदलताना पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा विवाह प्रमाणपत्र यांसारख्या अधिकृत कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे नाव अपडेट करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून पाहा.
जन्मतारीख अपडेट
जन्मतारीख फक्त एकदाच बदलता येते, त्यामुळे ती नोंदवताना अत्यंत काळजी घ्या. जन्मतारीख बदलण्यासाठी जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र किंवा इतर अधिकृत दस्तऐवजांची आवश्यकता असते. UIDAI या अपडेटसाठी कठोर नियम पाळते, त्यामुळे चुकीची माहिती टाळणे गरजेचे आहे.
पत्ता अपडेट
नवीन घरी स्थलांतर केल्यास किंवा कायमचा पत्ता बदलल्यास, तो अमर्याद वेळा अपडेट करता येतो. मात्र, पत्ता बदलण्यासाठी वीज बिल, भाडे करारपत्र किंवा बँक स्टेटमेंट यांसारखे पुरावे आवश्यक असतात.
मूळ कागदपत्रे सोबत ठेवा. आधार केंद्रात अपडेटसाठी प्रत्यक्ष पडताळणी होते.
तपासणी करूनच अर्ज सादर करा.चुकीची माहिती दिल्यास, ती पुन्हा सुधारता येईलच असे नाही.
नोंदणीकृत मोबाइल क्रमांक अपडेट ठेवा. OTP आणि महत्त्वाच्या नोटिफिकेशन्ससाठी आवश्यक.
आधार कार्डमध्ये वेळोवेळी आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. मात्र, काही अपडेट्सवर मर्यादा असल्याने माहिती भरताना विशेष काळजी घ्या. UIDAI च्या नियमांचे पालन करून योग्य पुराव्यांसह बदल केल्यास भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत.