महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रविवार दि. २३ फेब्रुवारी ।। उन्हाळा सुरु झाला असला तरी देशभरात होळीनंतर खरा उन्हाचा चटका बसायला सुरुवात होते. पण यंदा होळीपूर्वीच उन्हाचा तडाखा वाढला आहे. महाराष्ट्रात कमाल तापमान हळूहळू 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहचू लागले आहे तसेच किमान तापमानातही वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, रविवार आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.
देशात कमालीचा तामानाचा बदल जाणवत आहे.हवामान खात्याने सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येथे वीज कोसळण्याची शक्यता लक्षात घेता, खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सरकल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
पुणे-मुंबईत पारा पस्तीशी पार
मुंबईत उन्हाचे तीव्र चटके बसायला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुंबईचा पारा 37 अंशांच्या पार गेला होता. कुलाब्यात तापमानाचा पारा 35 अंश सेल्सियस होता. तर ठाण्यात 37 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईत कमाल तापमानासह किमान तापमानही चढेच नोंदवले जात आहे. पुण्यात कमाल तापमानात वाढ झाली असून शिवाजीनगर भागात शनिवारी 36.2 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली तर तळेगाव, कर्जत 38 अंशापर्यंत पोहोचले.
कराड मध्ये सर्वात जास्त तापमान
मराठवाड्यात लातूर (37.0°C), हिंगोली (36.9°C) आणि परभणी (36.6°C) तापामानाची नोंद झाली . छत्रपती संभाजीनगरमध्ये 36 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यातील कराड येथे सर्वाधिक 39.7°C तापमान झाली, तर सांगलीमध्येही उन्हाचा तडाखा जाणवला. कोकण विभागात पालघर (38.9°C) आणि रत्नागिरीत (38.6°C)ची नोंद झाली.
15 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने देशातील 15 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राजस्थानमधील हवामानात बदल झाल्यामुळे रात्रीच्या थंडीत पुन्हा एकदा वाढ झाली. 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान काश्मीरमध्ये पुन्हा पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. या वर्षी काश्मीरमध्ये हिवाळा बहुतांश कोरडा राहिला. दिल्लीत हलका पाऊस आणि रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नोएडामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे