महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा ठप्प; महाराष्ट्रातून जाणाऱ्या तब्बल २५० बस बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. २४ फेब्रुवारी ।। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे दोन्ही राज्यातील बससेवा ठप्प झाली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या २५० आणि पुण्यातून जाणाऱ्या आठ ते नऊ बस बंद आहेत. पोलिसांनी सीमेवर दोन्ही बस रोखल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यादरम्यानची सार्वजनिक बस सेवा बंद पडली आहे.

दोन दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या चालकास कानडी भाषा येत नसल्याच्या कारणावरून कर्नाटकात मारहाण झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी कर्नाटकातून येणाऱ्या बस काळे फासले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यात शनिवारी आंदोलन करण्यात आले. या मारहाणीमुळे राज्यात वातावरण तापले आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही राज्याच्या सार्वजनिक बस सीमेवर थांबविल्या आहेत. दोन्ही राज्यांच्या दरम्यानची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रविवारी सकाळपासून बंद करण्यात आली आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रातून दिवसाला साधारण अडीचशे बस कर्नाटकात जातात. तर, कर्नाटकातूनदेखील तेवढ्याच बस महाराष्ट्रात येतात. पुण्यातून कर्नाटकातील बेळगाव, कलबुर्गी, विजापूर या शहरांसाठी आठ ते नऊ बस धावतात. तसेच, सहा ते सात बस कर्नाटकातून पुण्यात येतात. या सर्व बस बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर बस थांबविल्या आहेत. त्यामुळे पुण्यातून कर्नाटकात जाण्यासाठी कोल्हापूर सीमेपर्यंत जावे लागते. तेथून पुन्हा कर्नाटकाच्या बसने प्रवास करावा लागत आहे.

महाराष्ट्राच्या सीमेवरच दोन्ही बाजूकडील बस थांबविल्या आहेत. पुण्यातून कर्नाटकासाठी आठ ते नऊ बस धावतात. त्या सध्या बंद आहेत. दोन्ही राज्या दरम्यानची बससेवा किती दिवस बंद राहील हे सांगता येत नाही. पोलिस त्यावर निर्णय घेतली. – प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *