महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ मार्च ।। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जाते आहे. अशातच उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र, त्यापूर्वी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची घोषणा होईल, असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. फेसबूक पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
करुणा मुंडे यांनी फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी उद्याची तारीख लिहीत राजीनामा होणार असं म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी संवादही साधला आहे. यावेळी बोलताना, ”मला आतून माहिती मिळाली आहे, की दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला आहे, उद्या अधिवेशन सुरु होण्यापूर्वी अजित पवार यासंदर्भातील घोषणा करतील”, असं त्यांनी म्हटलं आहे.
https://www.facebook.com/karunadmunde/posts/655006763720296?ref=embed_post
पुढे बोलताना, ”धनंजय मुंडे यांनी स्वत:ही सांगितलं की होतं की वाल्मिक कराड दोषी आढळला तर मी राजीनामा देईल. आता सीबीआयच्या चार्चशिटमध्ये वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
दरम्यान, या दाव्यानंतर आता राजकीय प्रतिक्रियाही उमटायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँघ्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार बजरंग सोनवणे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. करुणा मुंडे यांनी जी पोस्ट केली आहे, ती खरी असेल तर आणि त्या म्हणत आहेत तसं झालं तर याचं आम्ही स्वागत करतो. आपल्याला उद्याच्या दिवसाची वाट बघावी लागेल. त्यांना काही माहिती मिळाली असेल त्यामुळे त्यांनी हा दावा केला असेल, असे ते म्हणाले.