महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. ५ मार्च ।। भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मंगळवारी झालेला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामना भारताने चार विकेट्स राखून जिंकला. भारताचा मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहलीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताला हा विजय मिळवता आला. या विजयासहीत भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघादरम्यान आज होत असून हा सामना पाकिस्तानमधील लाहोर येथे होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ 9 मार्च रोजी दुबईमधील मैदानावर भारताविरुद्ध अंतिम सामना खेळेल. मात्र या दोन संघांपैकी भारतासाठी कोणता संघ अधिक सोयीस्कर ठरेल याबद्दल भारतीय चाहत्यांमध्ये भारत फायनलमध्ये पोहोचल्यापासूनच चर्चा सुरु आहे.
आज ठरणार भारताविरुद्ध फायनल कोण खेळणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. लाहोरमध्ये दुपारी अडीच वाजता मॅचला सुरुवात होईल. न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात जो जिंकेल तो संघ अंतिम सामन्यात टीम इंडियाशी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मैदानात उतरेल. साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंडने आताच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. दोन्ही टीमच्या ताफ्यात एकट्याच्या जीवावर सामना फिरवू शकणारे अनेक खेळाडू आहेत. त्यामुळे एकंदरीत दुसरी सेमी-फायनलही रंगतदार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दृष्टीकोनातून अंतिम सामन्यात कोणता संघ पराभूत करण्यासाठी अधिक सोपा ठरु शकतो या बद्दलची चाचपणी चाहते करत आहेत.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांची आकडेवारी काय सांगते?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान एकूण 94 एकदिवसीय सामने झालेत. यापैकी 40 सामने भारताने जिंकले असून 51 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. तीन सामन्यांचा कोणताही निकाल लागला आहे. भारतीय संघाने यापैकी 18 सामने घरच्या मैदानावर जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 26 सामने घरच्या मैदानावर जिंकलेत. घरच्या मैदानांवर न खेळलेल्या सामन्यांपैकी 12 सामन्यांमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेनेही त्यांच्या घरगुती मैदानांवर न खेळेल्या सामन्यांपैकी 14 सामन्यांमध्ये भारताला धूळ चारली आहे. त्रयस्त ठिकाणी खेळवलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यांपैकी 10 सामने भारताने जिंकलेत तर 11 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यांची आकडेवारी काय सांगते?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण 119 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले असून त्यापैकी 61 सामने भारताने जिंकले आहेत. न्यूझीलंडने भारताला 50 सामन्यांमध्ये धूळ चारली असून सात सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही. दोन्ही संघांमधील एक सामना टाय झाला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यांपैकी भारताने घरच्या मैदानावर 31 सामने जिंकलेत तर न्यूझीलंडने 26 सामन्यात घरच्या मैदानात विजय मिळवला आहे. घराबाहेरील मैदानावर खेळताना हे दोन्ही संघ जेव्हा आमने-सामने आलेत तेव्हा 14 वेळा भारत तर 8 वेळा न्यूझीलंडने बाजी मारली आहे. त्रयस्त ठिकाणी दोन्ही संघांनी एकमेकांना 16 वेळा पराभूत केलं आहे.
कोणता देश फायनलला आल्यास भारताला फायदा?
वरील आकडेवारी पाहिल्यास दक्षिण आफ्रिकेपेक्षा न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध अंतिम सामना खेळणं भारताच्या पथ्यावर पडू शकतं. दक्षिण आफ्रिकेच्या संघापेक्षा भारत न्यूझीलंडच्या संघाचा खेळ अधिक उत्तमप्रकारे जाणून घ्या. त्यामुळेच 9 मार्चला भारत फायनलसाठी मैदानात उतरेल तेव्हा समोर न्यूझीलंड असेल तर भारताला अधिक फायद्याचं ठरु शकतं.