15600 कोटींचा ‘हा’ महामार्ग 9 महिन्यात होणार सुरु; 13 तासांचा प्रवास 5 तासात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. ८ मार्च ।। 460 ते 471 किलोमीटरची लांबी, 13 वर्षांपासून सुरु असलेलं काम, 15600 कोटी रुपयांचा खर्च असा आवाढव्य आवाका असलेला महामार्ग पुढील 9 महिन्यांमध्ये सुरु होणार आहे. असं झालं तर सध्या या मार्गावर लागणारा 13 तासांचा वेळ अर्ध्याहून अधिकने कमी होऊन अवघ्या 5 ते 6 तासांवर येईल. विधानसभेमध्येच पुढील 9 महिन्यात हा महामार्ग खुला होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्या महामार्गाबद्दल आपण बोलतोय त्याचा क्रमांक आहे एनएच 66 आणि त्याचं नाव आहे मुंबई-गोवा महामार्ग…

विधानसभेत देण्यात आलं उत्तर
मागील 13 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आत्तापर्यंत सुमारे 15 हजार 600 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती शुक्रवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरातून समोर आली आहे. हा महामार्ग डिसेंबर 2025 पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहितीही या उत्तरात देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार व अन्य सदस्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामांबाबत विधानसभेच्या लेखी उत्तरातील माहिती तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावरील लेखी उत्तरात सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ही माहिती दिली आहे.

दोन महत्त्वाचे टप्पे बाकी
विधानसभेत देण्यात आलेल्या या उत्तरानुसार, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या कामांपैकी एकूण 84.60 किमी लांबीच्या रस्त्यापैकी 74.80 किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून पनवेल ते कासू या उर्वरित 42.3 किमी लांबीच्या रस्त्यावरील मोठे पूल- उड्डाणपुलाचे काम या महिन्यात म्हणजेच मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच कासू ते इंदापूर या 42.3 किमी लांबीच्या मार्गावरील मोठे पूल-उड्डाणपुलांचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याची योजना असल्याचं सांगण्यात आलं आहे.

एप्रिलमध्ये पूर्ण क्षमतेने सुरु होणार कशेडी बोगदा
कशेडी घाटामध्ये चौपदरीकरणाच्या कामामध्ये दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यातून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. उर्वरित दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून याच महिन्याच्या शेवटापर्यंत दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याची योजना आहे.

कुठून जाणार हा मार्ग?
पनवेल ते पेण, माणगाव, महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, पणजी, कानाकोना आणि मरगावमधून हा महामार्ग जाणार आहे. पश्चिम घाटातील डोंगररांगांना समांतर असलेला हा महामार्ग देशाच्या दक्षिण किनारपट्टीवरील एक अत्यंत महत्त्वाचा भाग जोडणारा ठरणार आहे. या महामार्गाचा फायदा कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूला जणाऱ्यांनाही होणार आहे. या महामार्गाचा काम 11 टप्प्यात करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *