महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. ९ मार्च ।। छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण, दैवतीकरण सुरू आहे. ती कबर उखडून फेकली पाहिजे असे विधान छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते.
यावर आता मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला असंच वाटतं की, कबर हटवली पाहिजे. मात्र काही गोष्टी कायद्याने कराव्या लागत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच औरंगजेबच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात एएसआयचं संरक्षण मिळालं असल्याचंही फडणवीस यांनी म्हटले आहे.
औरंगजेबाच्या कबरीबाबत कायद्यानुसार काही काम करावे लागेल. कारण ही कबर काँग्रेसच्या राजवटीत जतन करण्यात आली होती. तेव्हापासून कबर ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या संरक्षणाखाली आहे. कबरीचे संरक्षण कायदेशीर प्रक्रियेनुसार करण्यात आलं होतं. ते हटवणं किंवा बदलण्यासाठी कायद्याचं पालन करून करणं आवश्यक आहे. या मुद्द्यावर घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री श्री गुरु तेग बहादूर जी महाराज’ यांच्या ३५० व्या शहीद वर्षाच्या निमित्तानं आयोजित ‘गुरमत समागम’ कार्यक्रमाला आल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
अबू आझमींनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापले. त्यांनी औरंगजेबाची कबर ठेवण्याची काय गरज असा सवाल उपस्थित करत औरंगजेबाची कबर उखडून टाका असे विधान केले.
‘औरंगजेब काही देव नव्हता. हे सगळे परकीय आक्रमणकर्ते होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्माचे श्रद्धास्थान जपण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाने उलट केले. तो इथला नव्हता. लुटेरा होता. त्याच्या कबरीचे उदात्तीकरण कशासाठी करायचे? जेसीबी लावून ती उखडून टाका,” असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिला. यापूर्वी भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर भाजप मंत्री नितेश राणे यांनीदेखील औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी केली आहे.