Raj Thackeray : मी माझी भूमिका गुढीपाडव्याला मांडणार आहे – राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. ९ मार्च ।। मी आज फार काही बोलणार नाही. २० दिवसांवर गुढीपाडव्याचा मेळावा आहे. मी तिकडे दांडपट्टा फिरवणार आहे तर मग चाकू आणि सुरे कशाला काढू? सदानंद मोरेंनी आजच्या परिस्थितीवर बोलावं ही माझी अपेक्षा होती. राजकारणाचा चिखल झाला आहे. मतं मिळवण्यासाठी डोकी फोडून घेत आहेत, आगी लावत आहेत आणि हे आमच्या लोकांना समजत नाही असं राज ठाकरे म्हणाले.

एक छोटीशी गोष्ट सांगतो, प्रभू रामचंद्रांचा जेव्हा वनवास झाला तेव्हा ते निघाले, त्यांच्याबरोबर लक्ष्मण, सीतामाई सगळ्यांना घेऊन गेला. नाशिकमध्ये आले. १४ वर्षांचा ववनास त्यांनी भोगला. मध्यंतरीच्या काळात रामचंद्रांच्या सीतेला पळवून घेऊन गेला. मग वाली आणि सुग्रीव भेटले. वालीचा वध केला. त्यानंतर वानरसेना बरोबर घेतली. सेतू बांधला श्रीलंकेत गेले, तिथे रावणाचा वध केला. या सगळ्या गोष्टी १४ वर्षात त्यांनी केल्या. आपण वांद्रे वरळी सी लिंक बांधायला १४ वर्षे घेतली आहेत.

जी काही कामं सुरु आहेत ना त्याबद्दल मी सविस्तर गुढीपाडव्याला बोलणार आहेच. मग जातीपातीचे विषय, सोशल मीडियावर टाळकी भडकवणं हे जाणूनबुजून उद्योग सुरु आहेत. नुकताच महिला दिन झाला. ८ मार्च असल्याने तो दरवर्षी साजरा करतो. मला एकाने विनोद पाठवला आहे. २१ जून सर्वात मोठा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याने सांगितलं की साफ झूठ आहे. कारण तो दरवर्षी ८ मार्चला सुरु होतो आणि पुढच्या वर्षी ७ मार्चला संपतो. आपल्याकडे काय करतात? महिला दिनाच्या शुभेच्छा. दोन पुरुष एकत्र आले तरीही महिला दिनाच्या शुभेच्छा देतात. मागचा पुढचा काही विचार नाही बस आपल्या शुभेच्छा द्यायच्या. एका सर्वात मोठ्या महिला विसर आपल्याला पडला आहे. कारण महिला दिन हा जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. लहान असताना वडील मुलींकडे चाकरी करत आहेत हे त्यांना पहावलं नाही. शहाजीराजांना त्यांनी बंड करायला लावलं. त्या मातेच्या मनात स्वराज्य नावाची गोष्ट होती. तिचं स्वप्न तिने मुलाकडून घडवून आणलं. सगळ्या इतिहासाच्या मागे एका महिलेचं मन होतं हे आपण विसरतो. सर्वात पुढारलेल्या स्त्रिया महाराष्ट्रात मिळतील. आपण त्यातून काही घेणार आहोत का? विचार करणार आहोत का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे असं राज ठाकरे म्हणाले.

माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत, मला ते नकोत-राज ठाकरे
आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडला आहे यांचे आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले तरीही या पक्षातील माणसं एकत्र कशी काय राहतात? फेरीवाले कष्ट करत असतात. पण आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना? तसे माझ्या पक्षात नाहीत. आज या फुटपाथवर, तिकडून डोळा मारला की त्या फुटपाथवर. आपण दुकान बांधू, फेरीवाले होणार नाही. असाही टोला राज ठाकरेंनी लगावला. तसंच आपला पक्ष आणि संघटना मजबूत करणं जास्त महत्त्वाचं आहे. माझा जो गटाध्यक्ष आहे त्याला आणि त्याच्या घरातल्यांनाही वाटलं पाहिजे की माझ्या मुलाची काळजी घेत आहेत असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *