महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. ९ मार्च ।। पुणे शहरात भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत उघडकीस आणला आहे. पोलिसांच्या पथकाने मांजरीतील भेसळयुक्त पनीर तयार करणार्या उत्पादकाच्या गोदामावर छापा टाकला. या कारवाईत 1,400 किलो पनीर, भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी 1,800 किलो एसएमपी पावडर, 718 लिटर पामतेल असा 11 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मांजरी भागातील एका शेतातील गोदामात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पनीरचा साठा करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या अधिकार्यांना मिळाली. त्यानंतर एफडीए आणि पोलिसांच्या पथकाने मांजरीतील माणिकनगर परिसरात असलेल्या गोदामावर छापा टाकला. पंचांसमक्ष भेसळयुक्त पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. भेसळयुक्त पनीरचा साठा पंचांसमक्ष नष्ट करण्यात आला.