महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. ९ मार्च ।। यंदा फळांचा राजा देवगड हापूस आंब्याला वांझ मोहोराने दगा दिला आहे. केवळ ३० टक्केच आंबा उत्पादन होणार आहे. बदलत्या हवामानाने हा घात केला असून तिसऱ्या टप्प्यातील मोहोरही गायब झाला आहे. परिणामी, मे महिन्यात सर्वसामान्यांसाठी स्वस्त उपलब्ध होणारा हापूस आंबा यावर्षी महागणार आहे. (Hapus Mango)
आंब्याचे उत्पादन कमालीचे घटल्याने आंबा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहोर आला; मात्र अनुकूल वातावरण नसल्यामुळे व वांझ मोहोराचे प्रमाण जास्त असल्यामुळे पहिल्या टप्प्यात आंब्याचे उत्पादन २ ते ३ टक्केच झाले. जगप्रसिध्द देवगड हापूस आंबा आता कुठे किरकोळ प्रमाणात बाजारपेठेत दाखल होत आहे.
पहिल्या टप्प्यातील आंब्याचे उत्पादन हे २ ते ३ टक्केच झाले आहे. सध्या तरी आंब्याचा एक डझनी दर १ हजार ते १८०० रूपये आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मोहर आल्यानंतरचा हा पहिल्या टप्प्यातील आंबा आहे.
दुसऱ्या टप्प्यातील आंबा आता २० मार्च ते २० एप्रिल या कालावधीत होईल. मात्र दुसऱ्या टप्प्यातील आंब्याचे उत्पादन यावर्षी ३० टक्केच झाले आहे. हा दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंबा स्थानिक बाजारात व महाराष्ट्रातील इतर बाजारपेठांमध्ये जातो. परदेशातही आंब्याची निर्यात केली जाते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंब्याचा दर जास्तच असण्याची शक्यता आहे.