महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. १२ मार्च ।। नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) सुरक्षा नंबर प्लेट (HSRP Number Plate) बनवणारी दोन केंद्रे अचानक बंद झाल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या केंद्रावर नंबर प्लेट बदलून मिळणे बंद झाल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या वाहनधारकांना दुसऱ्या ठिकाणी सुरक्षा नंबरप्लेट बसविण्यासाठी जावे लागणार आहे; परंतु ते ठिकाण कोठे असेल, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल येथील लक्ष्मी सोसागादिीजवळ सुरक्षा नंबर प्लेटचे बसविण केंद्र आहे. या परिसरातील वाहनधारकांनी नोंदणी करताना या केंद्राची निवड केली होती; परंतु हे केंद्र अचानक बंद झाले आहे. सहा मार्चनंतर येणाऱ्यांना या ठिकाणी कोणत्याही सुरक्षा नंबरप्लेट बसवून दिल्या जात नाहीत. त्या ठिकाणी एक हेल्पलाइन क्रमांक लावण्यात आला आहे. नागरिक सुरक्षा नंबरप्लेट घेऊन आल्यानंतर त्यांना हे केंद्र बंद असल्याचे समजत आहे. केंद्राला टाळे पाहून वाहनधारकांची चिडचिड होत आहे. हेल्पलाइनवर फोन केल्यानंतर दोन दिवसांमध्ये नवीन केंद्राची माहिती कळविण्यात येईल, असे सांगितले जात आहे. यामुळे वाहनधारकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत असून अशा बंद होणाऱ्या केंद्राकडे जबाबदारी कशी दिली गेली, अशी विचारणा केली जात आहे.
केंद्र वाढवण्याची सूचना
पुण्यात २५ लाख वाहनांना सुरक्षानंबर प्लेट बसवावी लागणार आहे. त्या तुलनेत केंद्रांची सेंटरची संख्या अपुरी आहे. त्यामुळे कंपनीने तातडीने ही केंद्रे वाढवावी अशी सूचना आरटीओने संबंधित कंपनीला केली आहे.
…म्हणून केंद्रे बंद होतात
रोझमार्टा कंपनीने नंबर प्लेट बदलण्यासाठी शहरात १२५ केंद्रे सुरू केली आहेत. त्यापैकी काही केंद्रे या डीलरनादेखील देण्यात आली आहेत. त्या ठिकाणी वाहनधारक सुरक्षा नंबर प्लेट बसविण्यासाठी गेल्यास वादावादीचे प्रकार घडत आहेत. वाहनधारक नंबरप्लेटचे ब्रेकेिट बसविण्यास सांगतात. मात्र, त्याचे वेगळे पैसे देत नाहीत. तसेच, काही जुन्या गाड्यांच्या नंबरप्लेट निघत नाहीत. त्या गॅरेजमधून काढून आणाव्या लागतात. यावरून वाद होतात. त्यामुळे ही केंद्रेच बंद केली जात असल्याचे समोर आले आहे.