महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २० मार्च ।। शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. औरंगजेब त्यांच्यावर उलटला म्हणून हे प्रकरण बाहेर काढण्यात येत असल्याचं राऊत म्हणाले आहेत. पाच वर्षांनी हे प्रकरण पुन्हा उघडण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे सर्व ठाकरे कुटुंब व पक्षाला बदनाम करण्यासाठीच घडवले जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, “हे प्रकरणच नव्हतं, पण आता काही जणांनी दबावाखाली ते उघडण्याचा प्रयत्न केलाय. त्या मुलीच्या आई-वडिलांनी पाच वर्ष काहीही बोललं नाही, मग आता त्यांच्यावर कोणता दबाव आहे? एका युवा नेत्याच्या राजकीय करिअरवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.”
भाजपमध्ये काही ‘बाडगे’ गेल्यापासून हे प्रकार सुरू झाले आहेत. औरंगजेब प्रकरणात अडचणीत आलेल्यांना वाचवण्यासाठी हे नवीन षड्यंत्र रचले जात आहे. आम्हाला हे सगळं कोण करतंय आणि का करतंय हे माहिती आहे. जर असेच घडत राहिले, तर जस्टिस लोया, सोहराबुद्दीन, रमेश गोरे यांची प्रकरणेही पुन्हा उकरावी लागतील, असे राऊत म्हणाले.