महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. २२ मार्च ।। केवळ भारतातील नव्हे, तर जगभरातील क्रिकेट चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. आजपासून जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. पहिल्याच लढतीत, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दरम्यान या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी बीसीसीआयने आणखी एका नियमात मोठा बदल केला आहे.
सुपर ओव्हरच्या नियमात मोठा बदल
टी-२० क्रिकेटची सुरुवात झाली त्यावेळी सामना बरोबरीत सुटल्यानंतर निकाल लावण्यासाठी बॉल आऊटच्या साहाय्याने निकाल लावला जायचा. त्यानंतर सुपर ओव्हरचा नियम लागू केला गेला. दोन्ही संघांमध्ये ६-६ चेंडूंचा सामना खेळवला जातो. जो संघ सामना जिंकतो, तो विजयी ठरतो. मात्र आता सुपर ओव्हरच्या नियमातही अट घालण्यात आली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीआयने सुपर ओव्हरच्या नियमात बदल केला आहे. बदललेल्या नियमानुसार, सुपर ओव्हरसाठी केवळ १ तासाचा अवधी दिला जाणार आहे. सुपर ओव्हरच्या नियमाबाबत बोलताना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागण्यासाठी वाट्टेल तितक्या सुपर ओव्हर होऊ द्या, पण वेळ केवळ १ तासाचा असणार आहे.
पहिली सुपर ओव्हर सामना समाप्त झाल्याच्या १० मिनिटांनंतर सुरु व्हायला हवा. जर पहिला सुपर ओव्हरचा सामना टाय झाला, तर पुढील सुपर ओव्हरचा सामना पुढील ५ मिनिटात सुरु व्हायला हवा.
काय आहे सुपर ओव्हरचा नियम
सुपर ओव्हरचा नियम हा टी-२० क्रिकेटमध्ये सामन्याचा निकाल लावण्यासाठी तयार करण्यात आला आहे. जर धावांच्या पाठलाग करणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाइतक्याच धावा केल्या, तर सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली जाते.
जो संघ धावांचा पाठलाग करत होता, त्याच संघातील ३ फलंदाज सुपर ओव्हर खेळण्यासाठी मैदानात येतात. ६ चेंडूत गोलंदाजी करणाऱ्या संघाने २ फलंदाज बाद केले, तर फलंदाजी करणाऱ्या संघाचा डाव समाप्त होतो. त्यानंतर दुसरा डाव सुरु होतो आणि दुसऱ्या डावातही ६ चेंडूंचा सामना खेळवला जातो. जर सुपर ओव्हर बरोबरीत समाप्त झाली, तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवली जाते.