महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रविवार दि. २३ मार्च ।। स्फोटक सलामीवीरांमुळे ताकद वाढलेल्या गतउपविजेत्या हैदराबाद संघाचा आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना होत आहे. त्यातच घरच्या मैदानावर हा सामना होत असल्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांना विजयी सलामी देण्याची अधिक संधी आहे.
ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही आयपीएलमधील सर्वाधिक स्फोटक सलामीची जोडी म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी या दोघांनी तुफान आणले होते. परिणामी, हैदराबाद संघाने तीन वेळा अडीचशे पार धावा केल्या होत्या. यंदाही तशीच आक्रमक सलामी देण्यासाठी हे दोघे सज्ज आहेत. आता त्यांच्या साथीला हेन्रिक क्लासेन आणि ईशान किशन असे फलंदाज असल्यामुळे हैदराबादची फलंदाजी अधिक भक्कम झाली आहे. यंदा तिनशे धावांपर्यंत कोणता संघ मजल मारू शकतो, तर हैदराबाद संघाचे नाव प्राधान्याने घेतले जाते.
या हैदराबाद संघाचे नेतृत्व पॅट कमिंसकडे कायम आहे. तो हुकमी आणि मॅचविनर वेगवान गोलंदाजही आहेच, तसेच प्रसंगी फलंदाज म्हणूनही सामने जिंकून देऊ शकतो. असेच अष्टपैलूत्व नितीश कुमार रेड्डीकडे असल्यामुळे हैदराबादचा संघ परिपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे. यंदा त्यांनी मोहम्मद शमीचा आपल्या संघात समावेश केला आहे. तर फिरकीची मदार ॲडम झॅम्पावर असेल.
अभिषेक शर्मा हा केवळ आयपीएलच नव्हे तर भारती संघाचेही भवितव्य म्हणून ओळखला जात आहे. भारताच्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध मुंबईत ५४ चेंडूत १३५ धावांचा झंझावात सादर केला होता, त्यावेळी त्याचा स्ट्राईक रेट अडीचशेचा होता. अशी भरभक्कम फलंदाजी रोखण्याचे आव्हान राजस्थानच्या गोलंदाजांसमोर असणार आहे.